लहान मुलांचा आवडता नाश्ता म्हणजे आलू पराठा... गरमागरम, मऊ आणि चविष्ट आलू पराठा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यात देण्यासाठी हा पराठा उत्तम पर्याय आहे. (Do you like hot aloo paratha? 3 tips make paratha at home like you get at the dhaba)मात्र अनेकदा पराठा लाटताना त्यातून सारण बाहेर येतं, पराठा फाटतो किंवा व्यवस्थित फुगत नाही. अशावेळी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अगदी परफेक्ट आलू पराठा घरी सहज तयार करता येतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ मळताना योग्य घट्टपणा ठेवणे. पीठ खूप कडक असेल तर लाटताना तडे जातात आणि सारण बाहेर येऊ लागते, त्यामुळे पीठ नेहमी मऊ आणि सैलसर मळावं. त्याचबरोबर बटाट्याचं सारण करताना बटाटे पूर्ण थंड झाल्याशिवाय कुस्करु नयेत. गरम बटाट्यात ओलावा जास्त राहतो आणि त्यामुळे पराठा लाटताना आतलं सारण बाहेर येण्याची शक्यता वाढते. बटाट्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. नीट कुस्करलेले असणंही तितकंच गरजेचं आहे, कारण गुठळ्या राहिल्या तर लाटताना पराठा फाटतो. तसेच पिठात अगदी दोन चमचे तांदूळ पीठ आणि मैदा घालायचा. त्यामुळे सारण बाहेर येत नाही.
सारण भरताना त्याचं प्रमाणही योग्य असणं आवश्यक आहे. खूप जास्त सारण भरलं तर ते दाब सहन करू शकत नाही आणि कडांमधून बाहेर येतं. त्यामुळे मध्यम प्रमाणात सारण भरुन पीठाच्या कडा नीट बंद कराव्यात. कडा नीट चिकटवल्या नाहीत तर पराठा लाटताना लगेच उघडतो. यानंतर पराठा लाटताना हलक्या हाताने, समान दाब देत लाटणं खूप महत्त्वाचं असतं. जोरात लाटल्यास पराठा पातळ होऊन फाटतो आणि सारण बाहेर येतं. तसेच खाली चिकटतोही. त्यामुळे हलक्या हातानेच लाटा.
पराठा परतताना, काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तो अधिक चविष्ट होतो. तवा खूप गरम किंवा खूप थंड नसावा, मध्यम आचेवर पराठा परतला तर तो आतूनही छान शिजतो आणि बाहेरुन कुरकुरीत होतो. पराठ्यावर तूप किंवा बटर लावल्यास त्याला छान सुगंध आणि चव येते. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत पराठा नीट परतल्यास तो खायला अधिकच चांगला वाटतो. सारणात मीठ, तिखट, कोथिंबीर, थोडंसं आमचूर किंवा लिंबाचा रस घातल्यास त्याची चव अधिक खुलते.
अशा या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या तर आलू पराठा करताना सारण बाहेर येण्याचा त्रास होत नाही आणि प्रत्येक वेळी मऊ, फुललेला आणि स्वादिष्ट पराठा तयार होतो. गरमागरम आलू पराठा दही, लोणचं किंवा बटरसोबत खाल्ला तर त्याची मजा काही वेगळीच असते आणि घरच्यांकडून नक्कीच कौतुकाची थाप मिळते.
