बटाटा हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा घटक आहे असे म्हणायला हरकत नाही. पोळी-भाजी असो वा फराळ, कटलेट असो वा सांबर बटाट्याशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. (Do you eat lots of potatoes? Not only does it increase weight, it also causes other serious problems )पण जितका तो चविष्ट, तितकाच अति खाल्ल्यास आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. अनेकांना बटाटा पचायला हलका वाटतो, पण प्रत्यक्षात तो शरीरात वात वाढवणारा, म्हणजेच वातूळ स्वभावाचा असतो. त्यामुळे त्याचा अतिरेक शरीरावर वेगवेगळे परिणाम करू शकतो.
बटाट्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सतत जास्त प्रमाणात बटाटा खाल्ल्यास शरीरात साखरेची मात्रा पटकन वाढते आणि ती पुन्हा पटकन कमीही होते. या चढउतारामुळे थकवा, सुस्ती, जास्त भूक लागणे किंवा वजन जलद वाढणे असे त्रास उद्भवू शकतात. मधुमेह असलेल्या लोकांनी तर बटाट्याचा अतिरेक टाळणंच योग्य ठरतं.
पचनाच्या दृष्टीनेही बटाटा फारसा हितकर नसतो. तो पोटात गॅस, पोटफुगी, ढेकर, जडपणा किंवा अपचन वाढवू शकतो. बटाट्यात फायबर अत्यल्प असल्याने तो पचनक्रिया मंदावतो आणि जडत्व वाढवतो. वारंवार असे पदार्थ खाल्ल्यास आतड्यांवर ताण येऊ शकतो आणि कधी कधी बद्धकोष्ठतेचीही शक्यता निर्माण होते.
अति तळलेले बटाट्याचे पदार्थ फ्रेंच फ्राइज, वडे, कटलेट किंवा चिप्स यामुळे शरीरात जास्त प्रमाणात तेल, मीठ आणि स्टार्च साचतं. यामुळे कोलेस्टेरॉल वाढणे, त्वचेवर पुरळ येणे किंवा थकवा वाढणे असे दुष्परिणाम दिसू शकतात. बटाटा नुसता उकडून खाल्ल्यासही त्यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असल्यामुळे तो पोट फुगवू शकतो आणि भूक अधिक वाढवू शकतो, ज्यामुळे आपण नकळत जास्त खायला लागतो.
आयुर्वेदातही बटाट्याला वात वाढवणारा पदार्थ मानले आहे. वात वाढला की सांधे दुखणे, अंगात हलकी वेदना, थंडी जास्त जाणवणे किंवा पचन मंदावणे असे त्रास होऊ शकतात. काही लोकांना बटाटा खाल्ल्यावर लगेच जडपणा जाणवतो, कारण पोट त्याचे विघटन करण्यासाठी जास्त वेळ घेते.
म्हणून बटाटा पूर्ण टाळण्याची गरज नाही, पण योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे. बटाटा चविष्ट असतो, ऊर्जा देतो आणि जेवणात रंगतही आणतो. पण जेव्हा त्याचा आहारातील समावेश जास्त होतो तेव्हा मात्र त्याचे दुष्परिणाम जाणवायला सुरुवात होते. कोणत्याही पदार्थाचा अतिरेक चांगला नाही. त्याच प्रमाणे बटाटाही प्रमाणात खा. शक्यतो वाफवून, भाजून किंवा थोड्या तेलावर परतून खा. अति तेलकट पदार्थ म्हणजे पोटावर अत्याचारच.
