पोळी किंवा भाकरी मऊ आणि खायला छान लागावी असे प्रत्येकालाच वाटते. छान नरम पोळी केली की सुगरण असल्यासारखे वाटते. आणि ते खरेच आहे, चांगली भाजी - वरण करण्यापेक्षा चांगल्या पोळी - भाकऱ्या करता येणे नक्कीच जास्त चांगल्या स्वयंपाकाचे लक्षण आहे. जर तुमच्या पोळी - भाकरी छान मऊ होत नसतील तर कणिक मळण्यापासून ते पोळी शेकण्यापर्यंत काही छोट्या सवयी लक्षात ठेवल्या, तर पोळी-भाकरी केल्यानंतरही बराच वेळ मऊ राहते. करताना मऊ झालेल्या पोळ्या नंतर जर कडक होत असतील तर पाहा काय या टिप्स.
कणिक मळताना पाणी एकदम न घालता थोडे थोडे आणि हळूहळू घालावे. पाणी कोमट असेल तर कणिक छान मऊ होते. कणिक जरा सैलसर ठेवली तर पोळी कोरडी होत नाही. मळताना हाताने कणिक चांगली ओढून मळली पाहिजे. यामुळे पीठातील ग्लुटन नीट तयार होते आणि पोळी फुगते. कणिक मळल्यानंतर लगेच पोळ्या करु नयेत. कणिक झाकून किमान १५-२० मिनिटे विश्रांती द्यावी. या वेळेत पीठ पाणी शोषून घेते आणि कणिक अधिक मऊ होते. भाकरीसाठीही कणिक थोडा वेळ झाकून ठेवली तर ती तुटत नाही आणि मऊ लागते. भाकरीचे पीठ कोमट पाण्यातच भिजवा. साधे पाणी नको.
पोळीच्या कणकेत थोडेसे तेल घातले तर पोळी अधिक मऊ राहते.दिवसभर तशीच छान राहते. विशेषतः डब्यासाठी पोळ्या करताना हा उपाय उपयोगी ठरतो. भाकरीसाठी पिठात थोडे कोमट पाणी वापरले तर भाकरी कडक होत नाही. पोळी घडीची केली की मऊ होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घडी करा. पोळी मस्त होते. तवा योग्य तापलेला असणे फार महत्त्वाचे आहे. तवा खूप थंड असेल तर पोळी कोरडी होते आणि खूप गरम असेल तर जळते. मध्यम आचेवर पोळी शेकावी. पोळी उलटसुलट करताना जास्त वेळ तव्यावर ठेवू नये. भाकरीही मध्यम आचेवरच नीट शेका. पोळी शिजल्यानंतर लगेच डब्यात कोंबू नये. पोळी करताना त्या कापडात गुंडाळून ठेवाव्यात. यामुळे पोळ्या मऊ राहतात. भाकरीही कापडात गुंडाळून ठेवल्यास कोरडी होत नाही. भाकरी आणि पोळी करताना मऊ होतात. मात्र दिवसभर मऊच राहाव्या असे वाटत असेल तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा.
