उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा सीझन सुरू होतो. अनेकांना आंबा प्रचंड आवडतो. नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही आंबा खावासा वाटतो. पण दरवर्षी आपल्याला एक गोष्ट नक्कीच ऐकायला मिळते की, "जास्त आंबे खाऊ नका, कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते." पण खरंच असं होतं का? की ही केवळ एक जुनी समजूत आहे? यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.
'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना न्यूट्रिशन हेड डॉ. करुणा चतुर्वेदी यांनी सांगितलं की, आंबा पारंपारिकपणे "उष्ण फळ" मानला जातो, परंतु विज्ञान याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतं. त्यांच्या मते, कोणत्याही खाद्यपदार्थाला उष्ण किंवा थंड मानण्याऐवजी त्याच्या पोषक तत्त्वांच्या आधारावर समजून घेतलं पाहिजे. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि 'मॅंगिफेरिन' सारखे घटक असतात, ज्यामुळे पचनक्रियेदरम्यान शरीरात हलकी उष्णता जाणवू शकते. मात्र यामुळे तापाप्रमाणे शरीराचं तापमान वाढत नाही. म्हणजेच जाणवणारी उष्णता ही सौम्य आणि तात्पुरती असते.
कोणती काळजी घ्यावी?
खरा फरक हा तुम्ही किती प्रमाणात आंबा खाता यावर अवलंबून असतो. एक आंबा खाणं आणि एकाच वेळी ३-४ आंबे खाणं, या दोन्ही गोष्टींचा परिणाम वेगळा असतो. डॉ. चतुर्वेदी यांच्या मते, जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आंब्यातील फायबर आणि फ्रुक्टोज जास्त प्रमाणात घेतल्यास पोट फुगणं, जुलाब किंवा पोटदुखी अशा तक्रारी जाणवू शकतात.
जास्त आंबे खाण्याचे तोटे
जास्त प्रमाणात आंबे खाण्याचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे दिसू शकतात.
पचनक्रिया बिघडते, जास्त फायबर आणि नैसर्गिक साखर आतड्यांवर परिणाम करू शकते.
रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढू शकते, जे मधुमेहींसाठी चिंतेचं कारण आहे.
काही लोकांना ओठांच्या आसपास जळजळ किंवा खाज जाणवते. याचे कारण आंब्याच्या देठापाशी असलेला चिक असतो, ज्यामुळे त्वचेवर रिॲक्शन येऊ शकते.
जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोकाही असतो.
आंबा 'उष्ण' का वाटतो?
उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यावर उष्णता का जाणवते, याचे कारण केवळ ते फळ नाही. या ऋतूत शरीरात आधीच पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) असते आणि पचनक्रिया मंदावलेली असते. अशा वेळी जास्त गोड फळ खाल्ल्यास शरीरात जडपणा आणि उष्णता जाणवू शकते. म्हणजेच, हा अनुभव अनेक कारणांचा एकत्रित परिणाम आहे.याचा अर्थ असा नाही की आंबा खाणं सोडून द्यावे. फक्त तो योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
दिवसाला एक किंवा दोन आंब्यांपर्यंत मर्यादित राहा. दही किंवा पाण्यासोबत आंबा खा, जेणेकरून संतुलन राखलं जाईल. पचनशक्ती संवेदनशील असेल तर रिकाम्या पोटी आंबा खाणं टाळा. खाण्यापूर्वी आंबे काही वेळ पाण्यात भिजवून ठेवणे फायदेशीर मानलं जातं.
Web Summary : While mangoes are delicious, excessive consumption can cause digestive issues, increased blood sugar, and potential skin reactions. Experts advise moderation, suggesting pairing mangoes with yogurt or water and avoiding them on an empty stomach to mitigate any adverse effects.
Web Summary : आम स्वादिष्ट होते हैं, लेकिन ज़्यादा खाने से पाचन संबंधी समस्याएँ, ब्लड शुगर बढ़ना और त्वचा पर प्रतिक्रिया हो सकती है। विशेषज्ञ संयम बरतने, दही या पानी के साथ आम खाने और खाली पेट खाने से बचने की सलाह देते हैं।