दिवाळीत(Diwali 2025) फराळ तयार करणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. कोणाला वेळेचा अभाव असतो तर कोणाला एवढा फाफटपसारा नको वाटतो. ते लोक सरळ फराळ विकत आणून मोकळे होतात. पण प्रश्न जेव्हा मिठाईचा येतो, तेव्हा सण-उत्सव काळात बाजारात मिळणाऱ्या मिठाईची शंका येते. मावा, खवा, दूध, सुका मेवा कोणत्या प्रतीचा असेल हे सांगता येत नाही. अशा वेळी एखादी साधी सोपी वेळ न खाणारी मिठाई घरच्या घरी करता आली तर? ब्रिष्टी होम किचनमध्ये पाहिलेली अशीच सोपी रेसेपी जाणून घ्या, जी केल्यावर घरचे असो वा बाहेरचे, ही मिठाई घरी केलीत यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही!
डेसिकेटेड कोकोनट ड्राय फ्रूट रोल रेसिपी (Coconut Dry Fruit Roll Recipe for diwali 2025)
हा रोल दिवाळीच्या फराळासाठी किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी बनवण्यासाठी एक उत्तम, झटपट आणि स्वादिष्ट पर्याय आहे. यासाठी तुम्हाला गॅसजवळ जाण्याचीही गरज पडणार नाही.
साहित्य :
डेसिकेटेड कोकोनट: २ कप
मिल्क पावडर : १ कप
पिठीसाखर : १/२ कप (गोडीनुसार कमी-जास्त)
दूध : १/४ कप (किंवा आवश्यकतेनुसार)
तूप : २ चमचे (Mix करण्यासाठी)
गुलाबी रंग २ थेंब (ऐच्छिक)
सारणासाठी:
ड्राय फ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता) १/२ कप (बारीक चिरलेले)
खोबऱ्याचे तयार सारण (किंवा डेसिकेटेड कोकोनट) १/४ कप
वेलची पूड १/२ चमचा
कृती:
>> रोलची पारी तयार करण्यासाठी एका मोठ्या परातीत डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि पिठीसाखर एकत्र करा. हे मिश्रण व्यवस्थित मिसळा.
>> मिश्रणात तूप घालून ते बोटांनी चोळून घ्या, जेणेकरून तूप मिश्रणात एकजीव होईल.
>> या सारणाचा गोळा तयार होईल इतपत दूध घाला.
>> आता, मिश्रण दोन भागांत विभाजित करा.
>> एका भागात गुलाबी रंग (पाण्यात मिसळून) घाला आणि दुसऱ्या भागात पांढरा रंग तसाच ठेवा.
>> सारणासाठी एका भांड्यात बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता) घ्या.
>> त्यात खोबऱ्याचे तयार सारण (किंवा साधे डेसिकेटेड कोकोनट) आणि वेलची पूड मिसळा. त्यामुळे बाइंडिंग मिळेल.
>> रोल करण्यासाठी प्लास्टिक शीटचा वापर: एक बटर पेपर किंवा प्लास्टिकची जाड शीट घ्या आणि त्यावर तूप लावा.
>> गुलाबी रंगाचा गोळा घेऊन तो हाताने किंवा लाटण्याच्या मदतीने आयताकृती (rectangular) आकारात पसरा.
>> तयार केलेले ड्राय फ्रूट्सचे सारण घेऊन ते या आयताकृती मिश्रणाच्या एका बाजूला लांब पट्टीत पसरा.
>> प्लास्टिक शीटच्या मदतीने मिश्रण हळूवारपणे गुंडाळा. दाब देऊन घट्ट रोल तयार करा.
>> रोल एका ॲल्युमिनियम फॉइलमध्ये किंवा प्लास्टिक शीटमध्ये गुंडाळा आणि १ ते २ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
>> सेट झाल्यानंतर रोल फ्रिजमधून बाहेर काढा आणि समप्रमाणात त्याचे काप करून लगेच सर्व्ह करा.
>> मिठाईच्या डब्यात हे काप ठेवले तर कोणालाही विश्वास बसणार नाही की तुम्ही हे घरीच तयार केले आहेत.
>> हे रोल ७ ते १० दिवस फ्रिजमध्ये चांगले टिकतात. पहा व्हिडीओ :