कडबोळी हा दिवाळीतील अत्यंत चविष्ट आणि पारंपरिक खमंग पदार्थ आहे. त्याची कुरकुरीत, मसालेदार चव प्रत्येकाला आवडते. गोड पदार्थांच्या सोबतीला वेगळी चव देणारी कडबोळी दिवाळी फराळात असायलाच हवीत. (Diwali Food: Have you ever eaten coconut kadboli? Make crispy oil-free kadboli at home)ती एकदा करुन ठेवल्यास बराच काळ टिकतात आणि पाहुण्यांना देण्यासाठी अगदी मस्त पदार्थ आहे. त्यामुळे दिवाळीत कडबोळी नक्की करा. त्यासाठी ही सोपी रेसिपी पाहा.
साहित्य
बारीक रवा, तांदळाचे पीठ, बेसन, मीठ, लाल तिखट, हळद, जिरे पूड, पांढरे तीळ, नारळ, तेल, पाणी
कृती
१. बारीक रवा जर एक वाटी घेतला तर त्यानुसार प्रमाण घेताना दोन चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे. तसेच त्यात दोन चमचे बेसन घालायचे. तुम्ही रवा किती वाटी घेता त्यानुसार प्रमाण ठरवा. रवा बारीकच घ्या. जाड रव्याची कडबोळी मऊ पडतात.
२. बारीक रवा, कांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र करायचे. ढवळायचे आणि एकजीव करायचे. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. तसेच दोन चमचे लाल तिखट घालायचे. चमचाभर हळद घालायची. चमचाभर जिरे पूड घालायची. तसेच थोडे पांढरे तीळही घालायचे. सारे पदार्थ छान एकत्र करायचे.
३. नंतर त्यात ताजा नारळ घालायचा. त्यासाठी नारळ फोडा आणि खवून घ्या. ताजा खवलेला नारळ घाला. अर्धी वाटीभरुन नारळ घालायचा. नारळ घातल्यावर पुन्हा पदार्थ एकजीव करायचे. वाटीभर तेल तापवायचे. तयार पिठात गरमागरम तेल ओतायचे. चमच्याच्या मदतीने मिक्स करायचे. नंतर हाताने मळायचे. गरजे पुरतेच पाणी घ्या. पाणी जेवढे कमी वापराल तेवढे चांगले. पाणी लावून घट्ट पीठ मळून घ्यायचे.
४. तयार पिठाला छान आकार द्यायचा. हाताने लांब-लांब करुन टोकं जोडून कडबोळ्यांचा आकार द्यायचा. कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल मस्त गरम झाल्यावर त्यात एक-एक करुन कडबोळी सोडायची आणि मस्त खमंग तळून घ्यायची. छान खुसखुशीत कडबोळी तळून झाल्यावर हबावंद डब्यात साठवून ठेवायची.