थंडीच्या (Winter) दिवसांत काहीतरी गरमागरम आणि पोटभरीचं खाण्याची इच्छा होते. कोबी पराठा हा एक उत्तम पर्याय आहे. हा केवळ स्वादिष्टच नाही, तर अतिशय पौष्टिकही आहे. नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणालाही हा पराठा अगदी कमी वेळेत करता येतो. नेहमी पोळ्या किंवा भाकरी खाण्यापेक्षा हा पर्याय अगदी उत्तम आहे. (Dhabastyle Gobi Paratha Recipe)
कोबी पराठा करण्यासाठी काय साहित्य लागतं?
कोबी पराठा करण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने गव्हाचं पीठ, बारीक किसलेली कोबी, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि काही मसाले लागतील. प्रथम, पराठ्यासाठी मऊसर पीठ मळून घ्या. कणिक भिजवल्यानंतर ती किमान १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवणं आवश्यक आहे. ज्यामुळे पराठे लाटताना फाटत नाहीत. तोपर्यंत पराठ्यासाठीचं सारण तयार करा.
किसलेला कोबी एका भांड्यात घ्या. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, हळद, जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. सारणात मीठ घातल्यावर कोबीला पाणी सुटतं. त्यामुळे सारण लगेच वापरा. जर सारण जास्त वेळ ठेवायचे असेल, तर मीठ सर्वात शेवटी घाला. तुम्ही कोबीतील पाणी पिळून काढू शकता किंवा त्यात बेसन किंवा भाजलेल्या चण्याचं पीठ घालून थोडं मिसळू शकता, जेणेकरून ओलावा शोषला जाईल.
आता मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची छोटी वाटी तयार करा. या वाटीत कोबीचं सारण भरा आणि कडा बंद करून गोळा हलक्या हाताने दाबा. नंतर, पीठ लावून हा गोळा जाडसर पण गोल लाटून घ्या. पराठा तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून खूप कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत चांगला भाजून घ्या.
हा गरमागरम कोबी पराठा दही, लोणचं, टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा. या पराठ्यात तुम्ही गाजर किंवा इतर भाज्याही मिसळू शकता. आरोग्य आणि चव यांचा हा उत्तम संगम नक्की करून पाहा आणि हिवाळ्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे.
