Join us

ढाबास्टाईल दाल फ्राय १५ मिनिटांत घरीच करा; रोजच्या वरण-भाताची वाढेल चव, जीभेला येईल चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 21:28 IST

Dhaba style Dal Fry Recipe : गरमागरम जिरा राईससोबत खाण्यासाठी ही खास दाल फ्राय कशी बनवायची ते पाहूया.

जेवण म्हटलं की डाळ हवीच! पण रोजची साधी डाळ खाऊन कंटाळा आला असेल, तर दाल फ्राय हा एक उत्तम पर्याय आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारी ही दाल फ्राय आता तुम्ही घरच्या घरी, घरगुती मसाल्यांचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. गरमागरम जिरा राईससोबत खाण्यासाठी ही खास दाल फ्राय कशी बनवायची ते पाहूया.(How To Make Dal fry) दाल फ्राय ही अत्यंत सोपी आणि सर्वांची आवडती रेसिपी आहे. (Easy Dal Fry Recipe)

दाल फ्रायसाठी लागणारं साहित्य : (Ingredients For Dal Fry)

१ कप तुरीची डाळ

२ चमचे तेल किंवा तूप

१ चमचा जिरे

१/२ चमचा मोहरी

चिमुटभर हिंग

१ बारीक चिरलेला कांदा

१ बारीक चिरलेला टोमॅटो

१ चमचा आले-लसूण पेस्ट

१/२ चमचा हळद

१ चमचा लाल तिखट

१ चमचा धणे पावडर

चवीनुसार मीठ

बारीक चिरलेली कोथिंबीर

दाल फ्राय करण्याची कृती-

सगळ्यात आधी डाळ शिजवून घ्या तुरीची डाळ स्वच्छ धुऊन, कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या. डाळ जास्त घट्ट किंवा पातळ नसावी. नंतर मसाला तयार करा. एका कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून तडतडू द्या. पुढे कांदा आणि टोमॅटो परतून घ्या त्यासाठी त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून सुगंध येईपर्यंत परता. शेवटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

कढईतील मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट आणि धणे पावडर घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर शिजवलेली डाळ घालून ढवळा. चवीनुसार मीठ घालून चांगली उकळी येऊ द्या.नंतर पुन्हा फोडणी द्यावी लागेल. एका लहान कढईमध्ये थोडे तूप गरम करा. त्यात जिरे, मिरचीचे तुकडे आणि थोडी लाल मिरची पावडर घालून लगेचच डाळीवर घाला. यामुळे दाल फ्रायला एक खास चव आणि रंग येतो. तयार झालेली दाल फ्राय बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा. गरमागरम जिरा राईस, चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

दाल फ्राय परफेक्ट, चविष्ट होण्यासाठी काही टिप्स

1) दाल फ्रायसाठी तुरीची डाळ वापरणं उत्तम ठरतं

2) टोमॅटो परतून झाल्यावर त्यात थोडं पाणी घालून झाकून ठेवल्यास ते लवकर शिजतात.

3) शेवटच्या फोडणीसाठी तुपाचा वापर केल्यास चव अधिक चांगली लागते.

4) तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडणीत कडीपत्ता किंवा सुक्या लाल मिरच्या वापरू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स