विविध प्रकारच्या वडी महाराष्ट्रात केल्या जातात. त्यात कोथिंबीर वडी हा प्रकार फार लोकप्रिय आहे. तसेच अळूवडीही आवडीने खाल्ली जाते. (Delicious and crispy bottle gourd recipe - A tasty dish you've never tasted before, check out this amazing recipe)इतरही काही प्रकार असतात त्यापैकी एक चविष्ट प्रकार म्हणजे दुधीभोपळ्याची वडी. करायला अगदीच सोपी असते आणि चवीला एकदम छान लागते. करायला वेळही जास्त लागत नाही. पाहा कशी करायची ही कुरकुरीत वडी.
साहित्य
बेसन, मीठ, लाल तिखट, तेल, दुधी भोपळा, पाणी, मीठ, हळद, आलं, लसूण, हिंग, हिरवी मिरची, मोहरी, शेंगदाण्याचे कुट
कृती
१. दुधी भोपळा स्वच्छ धुवायचा. सोलायचा आणि मग किसून घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या. आल्याचा लहानसा तुकडा घ्यायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. आलं - लसूण - हिरवी मिरची अशी पेस्ट तयार करुन घ्यायची.
२. एका पातेल्यात चमचाभर तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. मग त्यात आलं - लसूण - मिरची पेस्ट घालायची आणि परतायची. थोडे हिंग घालायचे. छान परतून झाल्यावर त्यात त्यात किसलेला दुधी भोपळा घालायचा. शेंगदाण्याचे कुट घालायचे. भाजी छान परतायची.
३. एका पातेल्यात बेसन पीठ घ्यायचे. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. लाल तिखट घालायचे. हळद घालायची आणि मग ढवळून त्याची पेस्ट तयार करायची. पातळच करायची. ते मिश्रण भाजीत ओतायचे. दुधी छान खमंग परतून झाल्यावर त्यात हे पीठ घालायचे. ढवळत राहायचे. घट्ट व्हायला लागले की गॅस बंद करायचा. एका ताटाला तेल लावायचे त्यात तयार मिश्रण पसरवायचे. गार करायचे. त्याच्या वड्या पाडायच्या.
४. कढईत तेल गरम करायचे. त्यात तयार केलेल्या वड्या एकएक करुन सोडायच्या आणि छान तळून घ्यायच्या. कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या. सॉस किंवा चटणीसोबत खा. अगदी मस्त लागते.
