जेवणाला नेहमी तेच ते खाऊन कंटाळा आला की काहीतरी बाहेरंच खाण्याची इच्छा होते. घरच्याघरी सोप्या पद्धतीनं तुम्ही हॉटेलस्टाईलचे पदार्थ बनवले तर त्याची चव बाहेरच्या जेवणापेक्षा अप्रतिम लागेल. डाळ कांदा ही रेसिपी तुम्ही अगदी घरच्याघरी करू शकता. भातासोबत साधं वरण खाण्यापेक्षा तुम्ही चवदार चविष्ट डाळ कांदा बनवू शकता. डाळ कांदा तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. झणझणीत, पौष्टीक डाळ कांद्याची रेसिपी पाहूया. (Easy Spicy Dal Kanda Recipe)
डाळ कांदा करण्यासाठी लागणारं साहित्य
1) चणा डाळ: १ कप (भिजवलेली)
2) कांदा: २-३ मोठे (बारीक चिरलेले)
3) लसूण: ५-६ पाकळ्या (ठेचून)
4) मसाले: १ चमचा कांदा-लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट.
5) फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंग.
6) इतर: चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा गूळ (आवडीनुसार).
डाळ कांदा कसा करतात?
सगळ्यात आधी चणा डाळ स्वच्छ धुवून किमान १ ते २ तास कोमट पाण्यात भिजत ठेवावी. यामुळे डाळ लवकर शिजते आणि भाजीला छान पोत येतो.
नंतर फोडणीची तयार करा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची खमंग फोडणी द्या. त्यानंतर ठेचलेला लसूण टाकून थोडा परतवून घ्या.
आता चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतावा. डाळ-कांदा रेसिपीमध्ये कांद्याचे प्रमाण जास्त असल्यास चव अधिक खुलते.
कांदा परतल्यावर त्यात हळद, तिखट आणि कांदा-लसूण मसाला घालून मिक्स करा. आता भिजवलेली चणा डाळ घालून सर्व मिश्रण एकत्र परता.
गरजेनुसार थोडे गरम पाणी घालून कढईवर झाकण ठेवा आणि डाळ वाफेवर शिजू द्या. डाळ एकदम गाळ न करता थोडी अख्खी ठेवावी.
शेवटी चवीनुसार मीठ, थोडा गूळ आणि भरपूर कोथिंबीर घालून एक वाफ काढा.तुमचा झणझणीत डाळ कांदा तयार आहे. हा डाळ-कांदा ज्वारीची भाकरी किंवा गरम पोळीसोबत अप्रतिम लागतो.
