Join us

रोजचा वरणभात तब्येतीसाठी वरदान! मिळते भरपूर उर्जा आणि पोट भरल्याचं समाधान देणारी जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 17:04 IST

डाएट म्हंटलं की वरणभात नको असं कुणी सांगत असेल तर हे आधी वाचा. (health benefits of eating dal and chawal-varan bhaat)

ठळक मुद्देडाएट करत असाल तर वरणभात बंद असं करु नका, प्रमाणात खा वरणभात तृप्तीही देतो आणि पोेषणही.

शीतल मोगल (आहारतज्ज्ञ) ताटात गरम मऊ भात त्यावर साधं वरण त्यावर साजूक तूप लिंबाची फोड आणि असल्यास लिंबाचं लोणचं! आहाहा..... तोंडाला पाणी सुटतं! प्रत्येक मराठी मनात आणि घरात असलेला हा "वरण-भात" म्हणजे एक वरदानच आहे. भारत हा विविध धर्म व संस्कृतीने नटलेला देश आहे, भौगोलिक प्रदेश वेगळे आहेत पण तरीही सर्वत्र वरण भात वेगवेगळ्या रुपात भेटतोच. नावं वेगवेगळी असली तरी प्रत्येकाच्या घरात व ताटात अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

कुणी प्रवास करून आलं, हॉस्टेलमधला मुलगा किंवा मुलगी खूप दिवसांनी घरी आली आणि आईने विचारलं काय खायचं तर उत्तर असतं, आई, फक्त तुझ्या हातचा वरण-भात! आईच्या हातच्या वरण भाताची चव आणि तृप्ती पूर्ण जगात कुठेही मिळत नाही. प्रत्येक सणाला आणि नैवेद्याला वरण भाताचं स्थान अग्रगण्य आहे. अगदी बाळाच्या पहिल्या जेवणाची सुरुवात डाळ भाताच्या पाण्याने होते. 

वरणभात का महत्वाचा?

१. प्राचीन काळापासून आपल्या आहारात वरणभात आहे. वरण भाताला "पूर्ण अन्न " म्हणतात.२. डाळ व तांदूळ म्हणजे ऊर्जेचा व प्रोटीनचा भरभरून नैसर्गिक स्त्रोत. तुरीची डाळ ,मुगाची डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ अशा या सर्व डाळींमध्ये जीवनसत्व A, B6 ,C , K , फॉलिक ऍसिड, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.३. डाळ ही प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी डाळीमध्ये मॉलिब्डेनम हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ म्हणजेच चरबी बाहेर टाकण्यास मदत करते. हिंग गुळ व जिरे घालून शिजवलेली डाळ पोटाला थंडावा देते अशा डाळीचे वरण म्हणजे आरोग्यासाठी खजिना आहे.

४. तांदूळ ( भात ) यामध्ये चरबी हा घटक खूप कमी असल्याने पचनास तो खूप हलका असतो. अनेकदा भात करताना त्यावरील पेज काढून टाकण्यात येते परंतु ही पेज थंड व पौष्टिक असते ती काढून टाकणं योग्य नाही. तांदूळ (भात ) मधुर स्निग्ध बलदायक हलका रुची उत्पन्न करणारा, वीर्यवर्धक, शरीर पुष्ट करणारा, पित्तनाशक, लघवी साफ होण्यासाठी उपयोगी तसेच कृमीनाशक आहे. ५. यात फायबर मॅंगनीज सेलेनियम मॅग्नेशियम जीवनसत्व बी आणि यातील कार्बोहायड्रेट्स तुम्हाला उत्साही ठेवतात तसेच व्यायामाला चालना देण्यास महत्त्वाचे आहे. 

६. भात पचनासाठी सहज आणि पोटासाठी हलका असल्याने त्याच्या सेवनाने चांगली झोप येण्यास मदत होते आणि हार्मोन्सचे संतुलन चांगले राहते७. हा एवढा आरोग्यदायी खजिना डाळ आणि तांदूळ मध्ये असतो आणि त्यापासून बनवलेल्या वरण-भात हा आपल्याला निसर्गाने व आपल्या पूर्वजांनी दिलेल्या एक अमूल्य खजिनास आहे त्याचे जतन पिढ्यानपिढ्या होत गेले व होत राहणार आहेच.८. त्यामुळे डाएट करत असाल तर वरणभात बंद असं करु नका, प्रमाणात खा वरणभात तृप्तीही देतो आणि पोेषणही.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स