इडली हा असा पदार्थ आहे जो घरात केला की एक वेळ पुरतोच, पण उरलेल्या इडलीचे पदार्थही तितकेच छान लागतात. अनेकांना गरमागरम तळलेली इडली फ्राय आवडते, पण न तळताही साध्या तव्यावर केलेला इडली फ्राय अगदी तितकाच खमंग लागतो. कधी कधी त्याहूनही चविष्ट. कुरकुरीत आणि खमंग होते. शिवाय तळल्यावर ती फारच तेलकट होते. त्यापेक्षा परतलेली इडली जास्त पौष्टिक ठरते.
तव्यावर केलेल्या इडली फ्रायची खरी मजा नारळाच्या चटणीसोबत आहे. तसेच साधे मसाले किंवा फक्त लाल तिखट या दोन्ही गोष्टी इडलीला नवी चव देतात. तव्यावर परतताना इडलीला हलका तांबूस रंग येतो आणि त्याचा सुगंध तर आणखी भूक वाढवतो. उरलेल्या इडलीला नवी चव देणारा हा पदार्थ वेळही वाचवतो आणि चवही वाढवतो. सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी तव्यावरची इडली फ्राय हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. अगदी साध्या तंत्राने, कुठलेही अवघड साहित्य न वापरता, घराच्या स्वयंपाकघरातच तयार होणारा हा पदार्थ नक्की करा.
साहित्य
इडली, तूप, लाल तिखट, मोहरी, जिरे, कडीपत्ता, मीठ, धणे - जिरे पूड
कृती
१. इडलीचे लांब तुकडे करायचे. जाडच करायचे जास्त लहान नको. इडलीचे तुकडे केले नाही आणि अख्खी इडली परतली तरी छान लागते. फक्त जास्त कुरकुरीत होत नाही.
२. तवा गरम करायचा. तव्यावर तूप सोडायचे. चांगले दोन चमचे तूप घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. तसेच जिरे घालायचे. कडीपत्ता घालायचा. परतून घ्यायचा. चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. तसेच लाल तिखट घालायचे. मीठ घालायचे आणि त्यावर इडलीचे तुकडे ठेवायचे.
३. तुकडे परतायचे. दोन्ही बाजूनी आलटून - पालटून मसाला सगळीकडे लागेल याची काळजी घ्यायची. मसाला इडलीला छान लागल्यावर जरा कुरकुरीत होईपर्यंत परतायचे. थोडी जास्त परतली गेली तरी चालेल, स्मोकी चव फार छान लागते.
