संध्याकाळी चहाच्यावेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही बाहेरचे अन्नपदार्थ न खाता घरीच काहीतरी चटपटीत बनवू शकता. ब्रेड रोल हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. ब्रेड रोल करायलाही तितकाच सोपा आणि कमी वेळेत होणारा असतो. ब्रेड रोल करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Crispy bread roll Recipe)
ब्रेड रोल कसा करतात?
हा रोल करण्यासाठी सर्वप्रथम पूर्वतयारी म्हणून 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे साल काढून ते नीट कुस्करून घ्या. आता या बटाट्याच्या मिश्रणात चवीनुसार दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, आल्याची पेस्ट आणि भरपूर ताजी कोथिंबीर घाला.
चव वाढवण्यासाठी त्यात एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घालू शकता. हे सर्व साहित्य नीट एकजीव करून लंब वर्तुळाकार गोळे तयार करून एका बाजूला ठेवा.
मुख्य प्रक्रियेसाठी ताज्या पांढऱ्या ब्रेडची कडा सुरीनं कापून घ्या. एका पसरट भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात ब्रेडचे स्लाईस थोडावेळ बुडवून ठेवा आणि लगेच काढून दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये घट्ट दाबून त्यातील सर्व पाणी काढून टाका. आता या ओल्या ब्रेडच्या मधोमध बटाट्याचे तयार केलेला सारण ठेवा आणि ब्रेडला सर्व बाजूंनी दुमडून बटाट्याचे सारण व्यवस्थित आत बंद करा.
हातानं हलका दाब देऊन त्याला रोलचा आकार द्या. पाण्याचा अंश असल्यानं ब्रेड रोल सहज चिकटतो. रोलमध्ये कुठेही भेगा राहू नयेत याची काळजी घ्या. अन्यथा तळताना तेल आत जाऊ शकते. गॅसवर एका कढईत तेल चांगलं कडकडीत गरम करा. तेल तापल्यावर गॅसची फ्लेम मध्यम करा आणि सावधगिरीनं हे रोल तेलात सोडा. रोल सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तळताना घाई करू नका. मध्यम आचेवर तळल्यामुळे ते अधिक कुरकुरीत होतात. तयार झालेले गरमागरम ब्रेड रोल टिश्यू पेपरवर काढून घ्या. हे रोल तुम्ही हिरवी पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करू शकता.
Web Summary : Craving a snack? Make crispy bread rolls at home! Simply mash potatoes, add spices, and wrap in bread slices. Fry until golden brown and enjoy with chutney or ketchup.
Web Summary : चटपटा खाने का मन? घर पर बनाएं कुरकुरे ब्रेड रोल! आलू मैश करें, मसाले डालें, ब्रेड में लपेटें। सुनहरा होने तक तलें और चटनी या केचप के साथ परोसें।