अनेक प्रकारचे गोडाचे पदार्थ महाराष्ट्रात केले जातात. त्या पैकी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडी. अनेक प्रकारच्या वड्या केल्या जातात. आंबा वडी, नारळ वडी, सुकामेव्याची वडी , फणसाची वडी, विविध फळांची वडी केली जाते. (Coconut-potato vadi! home made food, tasty and easy recipes, Indian sweets, special Maharashtrian recipe)हा पदार्थ प्रसादासाठी, डब्याला द्यायला किंवा घरी कोणी आले की त्याला द्यायला म्हणून केला जातो. नारळ-बटाट्याची वडीही अशीच फार मस्त लागते. अनेकांना हा पदार्थ माहिती नाही, मात्र एक पारंपरिक ठेवणीतला पदार्थ आहे. एकदा नक्की करुन पाहा.
साहित्य
नारळ, बटाटा, दूध, साखर, वेलची पूड, तूप, साय
कृती
१. ताजा नारळ फोडून घ्यायचा. मस्त गोडसर नारळच घ्यायचा. नारळ खवायचा. नारळाचा फक्त पांढरा भागच वडीसाठी घ्यायचा. शेवटपर्यंत खरवडू नका. उरलेला भाग नंतर खरवडून भाजीसाठी वापरायला ठेवा. बटाटा उकडून घ्यायचा. एखादी शिटी जास्त काढा. बटाटा मऊ व्हायला हवा. दोन बटाटे असतील तर दोन वाटी नारळ हवा. एक वाटी दूध हवे.
२. उकडलेला बटाटा गार झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची. मग बटाटा किसून घ्यायचा. किसून झाल्यावर त्याला थोडे दूध लावायचे. म्हणजे तो छान मऊ होतो. एका कढीत किंवा पॅनमध्ये बटाट्याचा किस घ्यायचा. त्यात थोडी साय घालायची आणि ते मिश्रण गॅसवर ठेवायचे. मंद आचेवर परतायचे. त्यात पाणी अजिबात घालायचे नाही. जरा घट्ट होईपर्यंत परतायचे.
३. त्यात नारळ घालायचा. नारळ आणि बटाटा एकजीव होईल याची काळजी घेत ढवळत राहायचे. त्यात वाटीभर साखर घालायची. साखर छान विरघळेपर्यंत ढवळायचे. त्यात थोडे दूध आणि तूप घालायचे. मिश्रण छान ढवळायचे. सतत ढवळा बटाटा लगेच करपतो. कपरलेली वडी अजिबात चांगली लागणार नाही.
४. मिश्रण घट्ट होण्याआधी जरा पातळ होते. त्यामुळे जरा पातळ झाल्यावर फसले असे समजू नका घट्ट होईपर्यंत ढवळा. काही मिनिटांनी त्यात उकळी यायला लागेल आणि मिश्रण एकजीव आणि समान दिसायला लागेल. मग त्यात थोडी वेलची पूड घाला आणि मग गॅस बंद करा. एका खोलगट ताटाला तूप लावा आणि त्यावर तयार मिश्रण ओता. ते गार होऊ द्या. गार झाल्यावर त्याच्या सुरीच्या मदतीने वड्या पाडून घ्या.