Join us

Chickpeas Benefits : रोज सकाळी मूठभर भिजवलेले चणे खा, गंभीर आजारांना ४ हात लांब ठेवा; वाचा आरोग्यदायी फायदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:30 IST

Chickpeas Benefits : सकाळच्या नाश्त्यात मूठभर काळे चणे तुमच्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही. काळे हरभरे आपले आरोग्य निरोगी बनविण्यात आणि आपल्या शरीराला काही आवश्यक पोषक द्रव्ये पुरवण्यात मदत करू शकतात.

धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे  आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. आपल्या शरीराला दैनंदिन काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, जी पौष्टिक आहाराशिवाय मिळू शकत नाही. (Health Tips) आजच्या काळात पूर्वीसारखे अन्न राहिले नाही, की अन्नातून सर्व पौष्टिक घटक शरीरात पोहोचतात. यामुळे अनेकदा पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते. पण काळजी करू नका, कारण भिजवलेले चणे तुमच्या पौष्टिकतेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. (Chickpeas Benefits For Health)

काळे चणे का खायला हवेत?

सकाळच्या नाश्त्यात मूठभर काळे चणे तुमच्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही. काळे हरभरे आपले आरोग्य निरोगी बनविण्यात आणि आपल्या शरीराला काही आवश्यक पोषक द्रव्ये पुरवण्यात मदत करू शकतात. काळा हरभरा आजपासून नाही तर अनेक वर्षापासून आपल्या सर्वांच्याच घरात वापरला जात आहे. काही फिटनेस प्रेमी अधिक प्रथिने मिळविण्यासाठी भिजवलेले चणे खाणे पसंत करतात.

प्रोटीन्स, आर्यनचं भंडार

काळे चणे  हा प्रथिने आणि लोहाचा सुलभ स्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे प्रमाण पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत भिजवलेले चणे प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्ही अॅनिमियाने त्रस्त असाल तर काळ्या हरभऱ्याचा आहारात समावेश करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्याचे काम करते.

हृदयासाठी फायदेशीर 

काळे हरभरे देखील फायबरचा एक चांगला स्रोत आहे. जे कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित ठेवते. काळ्या हरभऱ्यामध्ये असलेले डायटरी फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवल्याने हृदयविकार होण्याचा धोकाही कमी होतो.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी डाएटिंग करत असाल तर तुमच्या आहारात काळ्या हरभऱ्याचा समावेश जरूर करा. काळ्या हरभऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक कमी होते.

अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी गुणकारी

काळ्या हरभऱ्यामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते आपल्या पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर असते. हे शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकू शकते. याचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर मात करण्याची क्षमता असते.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्न