इडली डोश्याची खरी चव वाढवणारी गोष्ट म्हणजे त्यासोबत दिली जाणारी चटणी. साऊथ इंडियन घरांमध्ये चवीला चटपटीत, पांढरीशुभ्र हलकी पिवळसर अशी चटणी इडली सोबत खाण्यासाठी केली जाते. ही चटणी चविष्ट तर असतेच पण पौष्टिकही असते. (Chana Dal Chutney Recipe)
चण्याच्या डाळीच्या चटणीसाठी लागणारं साहित्य
अर्धी वाटी चण्याची डाळी, भाजलेली किंवा फुटाण्याची डाळ घ्या, अर्धी वाटी ओलं खोबरं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, आल्याचा एक छोटा तुकडा, ४ ते ५ लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मोहरी, जीरं, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची.
चण्याच्या डाळीची पौष्टीक चटणी कशी करायची ते पाहू
सर्वप्रथम जर तुम्ही कच्ची चण्याची डाळ वापरत असाल तर ती मंद आचेवर हलकी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. फुटाण्याची डाळ वापरल्यास भाजण्याची गरज नसते.
आता मिक्सरच्या भांड्यात हलकी भाजलेली डाळ, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, चवीनुसार मीठ घाऊन एकत्र करा. यात थोडं पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्या. चटणी फार घट्ट वाटत असेल तर तुम्ही गरजेनुसार अजून पाणी घालू शकता.
चटणीची खरी चव तिच्या फोडणीत असते. एका छोट्या कढईत तेल गरम करा. तेल तापल्यावर त्यात राई, जीरं घाला. हे तडतडल्यानंतर त्यात कढीपत्त्याची पानं, सुकी लाल मिरची घाला ही गरम फोडणी तयार चटणीवर ओता आणि नीट मिसळून घ्या.
तयार आहे चवदार, स्वादीष्ट चण्याच्या डाळीची चटणी. ही चटणी तु्म्ही गरमागरम इडली, कुरकुरीत डोसा किंवा अप्पे यांसोबत सर्व्ह करू शकता. ही चटणी करायला सोपी आणि वेळ वाचवणारी असल्यामळे नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो.
चटणी परफेक्ट होण्यासाठी टिप्स
कच्ची चणा डाळ तेलात परतून घेतल्यानं चटणीला खमंग आणि दाणेदार चव येते. फुटाण्याच्या डाळीची पद्धत दाक्षिणात्य हॉटेल्समध्ये जास्त वापरली जाते. यामुळे चटणीला पांढरा रंग येतो आणि अतिशय मऊ पोत मिळतो.
चटणीला हलका आंबटपणा हवा असेल तर वाटतान त्यात थोडी चिंच किंवा दोन चमचे ताजं दही घालावं. यामुळे चटणीची चव संतुलित होते. चवीत समतोल राखण्यासाठी चिमूटभर साखर घातल्यानं हॉटेलसारखी चव येते. लसूण थोडा जास्त वापरल्यामुळे चटणीला छान स्वाद येतो तर आल्यामुळे पचन चांगले राहते.
चटणीची चव फोडणीवर अवलंबून असते. फोडणी करताना तेलात हिंग आवर्जून घाला. जर तुम्हाला हॉटेलसारखा लूक आणि चव हवी असेल तर फोडणीत अर्धा चमचा उडीद डाळ घाला. ही डाळ लालसर झाली की तिचा कुरकुरीतपणा चटणी खाताना छान लागतो.
