आपण अनेक लहान मोठे सण साजरे करतो. तसाच एक सण म्हणजे कांदेनवमी. इतर सणांप्रमाणे कांदेनवमी जागोजागी साजरी केलीच जाते असे नाही. मात्र कांदे नवमी ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक सण आहे. जो आषाढ महिन्याच्या शुद्ध नवमीला साजरा केला जातो. (Celebrate Kandenavmi, onion recipes, special food for special day, try it )या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व तर आहेच पण आहारशास्त्राच्या दृष्टीनेही या दिवसाकडे पाहीले जाते.
कांदे नवमीला भडली नवमी असेही म्हटले जाते. ही आषाढ शुद्ध नवमीला साजरी केली जाते. या दिवशी घराघरात कांद्याचे विविध पदार्थ तयार करून त्यांचा आस्वाद घेतला जातो. कारण दोन दिवसांनंतर येणाऱ्या आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. ज्यात कांदा, लसूण, आणि इतर काही पदार्थ खाणे टाळले जाते.
त्यामुळे या दिवशी मनसोक्त कांदा खाल्ला जातो. मात्र आजकाल पूर्वी प्रमाणे कांदा खाणे टाळले जात नाही. तरी कांदेनवमी साजरी करण्यात काहीच हरकत नाही. कांदे नवमीला कांदा भजी केली जातेच मात्र इतरही पदार्थ करता येतात. कांद्याची भाजी आणि पुरी हा बेत नक्की करुन पाहा.
साहित्य
तेल, लहान कांदा, नारळ, धणे पूड, मीठ, गरम मसाला, लाल तिखट, पाणी, मोहरी, हळद, हिंग
कृती
१. आकाराने जरा लहान असलेले कांदे घ्या. मोठे असतील तर त्याचे दोन तुकडे करा. कढईत तेल घ्यायचे आणि त्यावर कांदा परतायचा. मस्त खमंग परता. थोडा कुरकुरीत होऊ द्यायचा. कांदा परतत ठेवल्यावर दुसरीकडे मस्त वाटण तयार करायचे.
२. मिक्सरच्या भांड्यात ताजा नारळ घ्यायचा. किसून घ्यायचा आणि त्यात चार चमचे धणे पूड घालायची. तसेच गरम मसाला घालायचा. लाल तिखट घालायचे आणि थोडे पाणी घालून वाटून घ्यायचे. छान पेस्ट तयार होते. वाटल्यास लसूणही घालू शकता.
३. कांदे लालसर झाल्यावर कढईतून काढून घ्यायचे आणि त्या कढईत तेल घालायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग घालायचे. चमचाभर मीठ घाला आणि मग तयार वाटण तेलावर परतून घ्या. वाटण परतल्यावर त्यात उकळी येईल. मग त्यात परतलेले कांदे घालायचे आणि मस्त एकजीव करायचे. झाकण ठेवा आणि एक वाफ काढून घ्या.