इडली हा नाश्त्यासाठी वारंवार केला जाणारा पदार्थ आहे. चवीला मस्त लागते आणि पौष्टिकही असते. त्यामुळे पोटभर खाल्ली तरी काही हरकत नाही.(Breakfast Recipe: Easy way to make stuffed idli filled with spices, a special dish for children) इडली करायच्या विविध पद्धतींपैकी एक म्हणजे ही स्टफ्ड इडली. मसाला भरुन केलेली इडली फारच भन्नाट लागते. एकदा नक्की करुन पाहा. मुलांना डब्यासाठी द्यायलाही उत्तम पदार्थ आहे. शिवाय करायला सोपी आहे.
साहित्य:
इडलीचे पीठ, बटाटा, कांदा, टोमॅटो, मटार, गाजर, आले, लसूण, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर.
कृती:
१. सर्व भाज्या बारीक चिरुन घ्यायच्या. बटाटे उकडून घ्यायचे आणि सोलून कुस्करायचे. कुस्करलेले बटाटे बाजूला ठेवा.
२. कढईत थोडे तेल गरम करा आणि त्यात मोहरी घालून तडतडू द्यायची. नंतर जिरं घाला आणि छान फुलू द्या. जिरं फुलल्यावर त्यात कढीपत्ता घाला. फोडणी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यायचे.
२. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबीसर होईपर्यंत परतायचा. त्यानंतर टोमॅटो, गाजर आणि मटार घालून दोन-तीन मिनिटे शिजवायचे. सगळ्या भाज्या मस्त शिजल्यावर एक वाफ काढून घ्यायची.
३. त्यात हळद आणि मीठ घालून ढवळून घ्यायचे. शेवटी बटाटे घालून सगळं मिश्रण एकत्र परतायचे. गॅस बंद करुन वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मसाला थंड होऊ द्या.
४. इडलीचे पीठ आधीच भिजवून तयार ठेवायचे. जसे नेहमी भिजवता अगदी तसेच पीठ भिजवा. पीठ फार घट्ट किंवा फार पातळ नका करु योग्य प्रमाणात वाटून घ्यायचे. मध्यम घट्टपणा ठेवा म्हणजे इडल्या फुलतात आणि मऊ होतात.
५. इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून घ्या, म्हणजे इडल्या चिकटत नाहीत. आता साच्यात अर्धा चमचा इडलीचे पीठ ओतायचे. सगळ्या गोलात मस्त प्रमाणात पीठ ओता.
६. त्यावर तयार केलेल्या मसाल्याचे एक चमचाभर मिश्रण ठेवा आणि पुन्हा वरून थोडं इडलीचं पीठ घाला, जेणेकरुन मसाला मध्यभागी राहील. सर्व साचे अशाच प्रकारे भरुन इडलीच्या पात्रात ठेवा. वाफेवर सुमारे २० ते २५ मिनिटे शिजवा.
ही मसाला स्टफ्ड इडली बाहेरुन मऊ आणि आतून मसालेदार लागते. गरमागरम इडली आवडत्या चटणी, सांबार किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाता येते. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाऊसाठी ही एक छान आणि पौष्टिक रेसिपी आहे.