राज्यसभेत जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना भाजपाचे खासदार घनश्याम तिवारी यांनी ढाबे, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी काळ्या रंगाच्या प्लास्टिक भांड्यांच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. हे सामान्य प्लास्टिक नसून, ते प्रामुख्याने ई-कचरा किंवा इतर टाकाऊ प्लॅस्टिक सामग्रीपासून तयार केलं जातं. जर यात गरम अन्न ठेवलं गेलं तर 'मायक्रोप्लॅस्टिक'चे कण अन्नात मिसळू शकतात, असं तिवारी यांनी म्हटलं. या विषयावर तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
हे डबे कसे बनवले जातात?
विविध रिपोर्टनुसार, काळ्या रंगाचं प्लास्टिक बनवण्यासाठी अनेकदा इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि इंडस्ट्रियल प्लास्टिकचा वापर केला जातो. हे डबे आगीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात 'डेकाबीडीई' सारखे घातक केमिकल (फ्लेम रिटार्डंट्स) मिसळले जातात. मोठी समस्या अशी आहे की, हे केमिकल्स प्लास्टिकमध्ये घट्टपणे मिसळलेले नसतात. जेव्हा यात गरम किंवा तेलकट अन्न ठेवले जाते, तेव्हा हे केमिकल्स वितळून अन्नात मिसळतात. याशिवाय, या प्लास्टिकमध्ये BPA आणि थॅलेट्ससारखे घटक असतात, जे शरीरातील हार्मोन्सवर वाईट परिणाम करतात. अशा डब्यांचा वारंवार वापर केल्यास हे विषारी केमिकल्स शरीरात जमा होऊन दीर्घकाळात मोठं नुकसान पोहोचवू शकतात.
तज्ज्ञांचं मत काय?
२०२४ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात २०० हून अधिक काळ्या रंगाच्या प्लास्टिक उत्पादनांचं विश्लेषण करण्यात आलं, ज्यामध्ये सुमारे ८५ टक्के उत्पादनांमध्ये विषारी केमिकल्स आढळले. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, डॉ. अरविंद बडिगेर यांनी सांगितलं की, या केमिकल्सच्या सततच्या संपर्कामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
डॉ. सचिन त्रिवेदी यांच्या मते, BPA आणि थॅलेट्समुळे केवळ हार्मोनल असंतुलनच होत नाही, तर हृदयविकार, मधुमेह आणि प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढतो. तसेच प्रोफेसर चिंतामणी यांनी स्पष्ट केलं की, काळ्या प्लास्टिकमधून बाहेर पडणारे मायक्रोप्लॅस्टिक शरीरातील 'टॉक्सिक लोड' वाढवतात, ज्यामुळे भविष्यात अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
कोणाला अधिक धोका?
तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, लहान मुलं, गर्भवती महिला आणि आधीच आजारी असलेल्या व्यक्तींवर याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो. जरी कॅन्सरशी याचा थेट संबंध अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेला नसला, तरी त्यातील केमिकल्स पाहता सतर्क राहणं आवश्यक आहे.
काय काळजी घ्यावी?
तज्ज्ञांच्या मते, काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या डब्यांऐवजी काच, स्टील किंवा लाकडी भांड्यांचा वापर करणं अधिक सुरक्षित आहे. विशेषतः अन्न गरम करण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणं हाच आरोग्यासाठी उत्तम मार्ग आहे.
