Guar Beans Benefits : गवाराच्या शेंगांची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. या शेंगांची भाजी तर सगळेच लोक नेहमीच खात असतील, पण अचानक या शेंगांची इतकी चर्चा होऊ लागल्यानं अनेकांचं याकडे अधिक लक्ष वेधलं गेलं आहे. पण तरीही अनेकांना चर्चेची कारणं माहीत नाही. चला पण एक गोष्ट चांगली झाली, निदान सोशल मीडियावरील या चर्चेमुळे या शेंगा चर्चेत तर आल्या...कारण नेहमीच जरी खाल्ल्या जात असल्या तरी यांच्या फायद्याबाबत क्वचितच कुणाला माहीत असेल. अशात आज आपण या शेंगांच्या भाजीचे (Guar Beans Viral On Social Media) फायदे काय होतात हे पाहणार आहोत, सोबतच सोशल मीडियावर चर्चा का रंगलीये तेही पाहणार आहोत.
गवाराच्या शेंगांना क्लस्टर बीन्स असंही म्हटलं जातं. यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. जे आपल्याला वजन कमी करण्यास, मेंदूची क्षमता वाढवण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. अशात आज आपण या शेंगांचे तीन मोठे फायदे पाहणार आहोत.
गवाराच्या शेंगांचे फायदे
वजन कमी होतं
वाढलेल्या वजनामुळे आजकाल भरपूर लोक चिंतेत आहेत. आपलंही वजन वाढलं असेल तर आपण नियमितपणे गवाराच्या शेंगांची भाजी खाल्ली पाहिजे. कारण या शेंगांमध्ये भरपूर फायबर असतं. जे वजन कमी करण्यास मदत करतं.
पोट लगेच होईल साफ
अनेकांना रोज सकाळी व्यवस्थित पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची समस्या असते. अशा लोकांनी गवाराच्या शेंगा नियमित खायला हव्यात. कारण यातील फायबरमुळे पोट लवकर साफ होतं. इतकंच नाही तर पोटासंबंधी इतरही समस्या या शेंगांनी दूर होतात.
मजबूत होतात हाडं
हाडं जर नेहमीच मजबूत ठेवायची असतील तर कॅल्शिअमची गरज असते. गवाराच्या शेंगांमध्ये कॅल्शिअम भरपूर असतं. असं म्हटलं जातं की, या शेंगांमधील फॉस्फोरस आणि कॅल्शिअमनं हाडं मजबूत होतात. त्यामुळे या शेंगा नियमितपणे खाल्ल्या पाहिजेत.
सोशल मीडियावर का होतेय चर्चा?
अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तुंवर 25 टक्के टॅरीफ लावला आहे. ज्यातून डोनाल्ड ट्रम्प यांनी गवार गमला सूट दिली आहे. पण भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या गवार गमवर टॅरीफ लागणार नाही. मग असा प्रश्न उभा राहतो की, गवार गम आहे तरी काय?
तर गवार गम गवाराच्या शेंगांमधील बियांपासून तयार केला जातो. गवार गमचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. ज्यात खाद्य, औषधं, कागद, कापड, विस्फोटक, तेल, गॅस आणि सौंदर्य प्रसाधनं यांचा समावेश आहे. यामुळेच याचं महत्व अधिक आहे. याच गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.