Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबट - गोड गुलाबी सोलकढी पिणार का ? रंग घातलेली विकतची नको, घरी करा झटपट अस्सल कोकणी चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2026 17:17 IST

Authentic Konkani solkadhi recipe, Homemade solkadhi without artificial colour Natural pink drink recipe : सोलकढी फक्त चविष्ट नाही तर पौष्टिकही.

कोकण किनारपट्टीचा उल्लेख झाला की नारळ, आंबट-गोड चव आणि ताजेतवाने करणारी सोलकढी आठवते. मसाले भात असो किंवा साधं जेवण, शेवटी थंडगार सोलकढीचा ग्लास मिळाला की जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं. (Authentic Konkani solkadhi recipe, Homemade solkadhi without artificial color Natural pink drink recipe)चवीला हलकी, पचायला सोपी आणि शरीराला थंडावा देणारी सोलकढी ही केवळ पेय नसून पारंपरिक आरोग्यदायी पेय म्हणून ओळखली जाते. पचनासाठी सोलकढी अगदीच भारी असते. 

सोलकढी करण्यासाठी चांगला कोकम अर्क आणि ताजा नारळा लागतो. कोकमच्या साली स्वच्छ धुऊन कोमट पाण्यात काही वेळ भिजत ठेवाव्यात, जेणेकरून त्यांचा रंग आणि आंबटपणा पाण्यात उतरतो. कोकम गर किंवा अर्क बाजारात उपलब्ध आहे. तसेच आमसुलाचाही वापर करु शकता. दरम्यान ताजा नारळ किसून त्यातून घट्ट नारळाचं दूध काढावं. भिजवलेलं कोकम पाणी गाळून घ्यावं आणि त्यात नारळाचं दूध मिसळावं. चवीनुसार मीठ घालावं. फोडणीसाठी थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, चिरलेली लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घालून ही फोडणी सोलकढीत टाकावी. फोडणी केली नाही तरी चालते. फक्त त्यात बारीक चिरलेली कोथिंबीरही घालतात. सर्व मिश्रण नीट ढवळून थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास सोलकढी अधिक चविष्ट लागते. 

सोलकढी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोकममध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. नारळाच्या दुधामुळे सोलकढी पौष्टिक होते आणि शरीराला आवश्यक स्निग्ध पदार्थ मिळतात. जेवणानंतर सोलकढी घेतल्यास पचन सुधारते आणि जड अन्नामुळे होणारी अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते. कोकममधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करण्यास सहाय्य करतात. तसेच सोलकढी भूक वाढवण्यास आणि तोंडाची चव सुधारण्यास मदत करते.

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणानंतर किंवा तिखट-तेलकट अन्नानंतर सोलकढी पिणे विशेष लाभदायक ठरते. मात्र ती नेहमी ताजी करुनच पिणे योग्य. नारळाचे दूध जास्त वेळ ठेवल्यास आंबण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो एका दिवसातच संपवावी. एकूणच, सोलकढी ही कोकणातील परंपरा जपणारी आहे. चव आणि आरोग्य यांचा सुंदर मिलाफ असलेले पेय आहे. थंडावा, पचनास मदत आणि हलकी आंबट-गोड चव यामुळे सोलकढी प्रत्येकाने उन्हाळ्यात जरूर करून पाहावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Kokum Solkadhi: A Refreshing, Authentic Konkani Drink Recipe

Web Summary : Beat the heat with homemade Kokum Solkadhi! This traditional Konkani drink aids digestion, cools the body, and offers a delicious blend of sweet and sour flavors. Easy to make with coconut milk and kokum, it's a healthy and refreshing summer beverage.
टॅग्स :अन्नसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती