एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हणतात ते उगीच नाही, त्यानिमित्ताने चवबदल म्हणून केलेला फराळ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच ठरते. सुगरणीसुद्धा उपासाचे पदार्थ शोधून काढतात. जोडीला साबुदाण्याचे पापड, बटाट्याचा, रताळ्याचा किस, भाजी, कोशिंबीर, वरी भात, दाण्याची आमटी असे अनेक जिन्नस असतात. नैवेद्याला गोड म्हणून शिंगाड्याचा शिरा, लाडू, रताळ्याच्या गोड फोडी किंवा अलीकडे रताळ्याचे गुलाबजाम केले जातात. त्यात भर म्हणून ही रसमलाईची रेसेपी करून बघा. घरच्यांना नक्कीच आवडेल. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. ही रेसेपी एक दिवस आधी करून फ्रिजमध्ये ठेवली तर उपासाच्या दिवशी थंडगार रसमलाईचा आस्वाद घेता येईल. चला तर पाहूया रेसेपी -
उपासाची रसमलाई
साहित्य : बारीक साबुदाणा, मिल्क पावडर, साखर, वेलची पूड, दूध, मिल्क मेड, सुका मेवा
कृती :
- सर्वप्रथम १ वाटी बारीक साबुदाणा दोन ते चार वेळा धुवून घ्या.
- त्यानंतर १५-२० मिनिटं पाण्यात भिजवून घ्या.
- तोवर अर्धा लिटर दूध तापवून घ्या आणि ते घट्ट होण्यासाठी त्यात चवीनुसार मिल्क मेड आणि वेलची पूड घाला.
- वीस मिनिटांनी साबुदाणा पाण्यातून काढून मिक्सर जार मध्ये वाटून घ्या.
- त्यात चवीनुसार साखर आणि अर्धा वाटी मिल्कपावडर घाला.
- हाताला तूप लावून त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि ते दुधात सोडा.
- पाच ते दहा मिनिटं दुधात चांगले एकजीव होऊ द्या.
- वरून सुका मेवा घाला.
- साबुदाण्यामुळे या रसमलाईला छान टेक्स्चर येते आणि रसमलाई थंड करून खाल्ल्यावर छान लागते.
पहा ऐश्वर्या सोनावणे हिने शेअर केलेला या रेसिपीचा व्हिडीओ -