हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला अधिक उष्णता, ताकद आणि पोषणाची गरज असते. अशा वेळी पारंपरिक आणि सहज उपलब्ध असलेले पदार्थ आहारात असावेत. (As soon as the cold increases, eat jaggerychana, the cold will go away - eat a nutritious snack - see the simple recipe)जसे की गूळ-चणे हा पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. गूळ आणि चणे यांचा हा पदार्थ केवळ चविष्टच नाही, तर शरीराला आतून बळकटी देणारा आहे.
हिवाळ्यात थंडीमुळे पचनशक्ती काही प्रमाणात मंदावते. गूळ पचनास मदत करतो, आतड्यांची हालचाल सुधारतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतो. चण्यांमधील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे गूळ-चणे खाल्ल्याने पोट हलके राहते आणि अन्न नीट पचते.
थंडीच्या दिवसांत अनेकांना अशक्तपणा, थकवा किंवा ऊर्जा कमी झाल्यासारखे जाणवते. गुळामध्ये नैसर्गिक साखर, लोह आणि खनिजे असतात, जी शरीराला त्वरित ऊर्जा देतात. चण्यांमधील प्रथिने आणि जटिल कार्बोहायड्रेट्स शरीराची ताकद वाढवतात आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे गूळ-चणे खाल्ल्याने दिवसभर स्फूर्ती टिकून राहते.
हिवाळ्यात सर्दी-खोकला, अंगदुखी यांसारखे त्रास वाढतात. गूळ शरीरात उष्णता निर्माण करतो आणि थंडीचा परिणाम कमी करतो. चणे शरीराला आवश्यक पोषण देऊन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. नियमितपणे गूळ-चणे खाल्ल्याने शरीर आजारांशी लढण्यासाठी अधिक सक्षम बनते.
साहित्य
चणे, गूळ, तूप, पांढरे तीळ
कृती
१. चांगले असे चणे घ्यायचे. चण्याची साले काढून टाकायची. चांगल्या दर्जाचा गूळ घ्यायचा आणि किसायचा. एका पॅनमध्ये किंवा पसरट पातेल्यात चमचाभर तूप घालायचे. गॅस मंद आचेवर ठेवायचा. तूप जरा तापले की त्यात किसलेला गूळ घालायचा. गूळ पूर्ण विरघळला की त्यात चणे घालायचे.
२. गूळ सतत ढवळत राहायचा. नाहीतर जळतो. चणे घातले की न थांबता ढवळायचे. त्यात वाटीभर पांढरे तीळ घालायचे. गूळ चण्यांना लागल्यावर गॅस बंद करायचा. एका ताटात चण्याचे मिश्रण घ्यायचे. गार करत ठेवायचे. गार झाल्यावर हाताने चणे वेगळे करुन घ्यायचे. गूळ गार झाल्यावर कुरकुरीत होतो. हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे.
