थंडीच्या दिवसांत गरमागरम सूप पिण्याचा आनंद काही वेगळाच. रात्री तर थंडी एवढी वाढलेली असते की गरमागरम सूप पिऊनच जेवणाची सुरुवात करावी असं हमखास वाटतं. सूप हा असा पदार्थ आहे जो म्हटलं तर करायला अगदी सोपा आणि शिवाय भरपूर पोषण देणारा. म्हणूनच तर अमृता फडणवीस यांच्या घरीही अगदी एक दिवसाआड शेवग्याचं सूप केलं जातं. कारण शेवग्याला सुपरफूड म्हणतात. त्यातून लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. शिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही शेवगा उपयुक्त ठरतो. या सगळ्या फायद्यांमुळे फडणवीस यांच्या शेवग्याचं सूप वारंवार केलं जातं. त्यासाठी त्यांची रेसिपी कोणती आहे, याविषयीची माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे...(Amruta Fadanvis Shared Her Recipe Of Moringa Soup)
अमृता फडणवीस यांनी सांगितली शेवग्याच्या सूपची रेसिपी
अमृता म्हणाल्या की शेवग्याच्या बारीक फोडी करून त्या उकडून घ्या. उकडून घेतलेल्या शेंगा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्या. यानंतर त्या गाळून घ्या.
थंडी पडताच केस कोरडे झाले, कोंडाही वाढला? 'या' पद्धतीने काेरफड लावा- केस होतील मऊ, सिल्की
त्यामध्ये चवीनुसार मीठ, मिरेपूड घाला आणि त्याला लसूणाची फोडणी घाला. आता त्यांनी सांगितलेली रेसिपी छान आणि सोपी तर आहेच.. पण तुम्ही आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीनेही शेवग्याचं सूप करू शकता. ते कसं करायचं ते पाहा...
शेवग्याच्या शेंगेचं सूप करण्याची रेसिपी
शेवग्याच्या शेंगेच्या फोडी करून त्या कुकरच्या भांड्यामध्ये घाला. त्यातच बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी मुगाची डाळ, लसूणाच्या ५ ते ६ पाकळ्या आणि कडिपत्त्याची काही पानेही घाला. हे सगळे पदार्थ एकत्र शिजवून घ्या. यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून गाळून घ्या.
साऊथस्टाईल बेन्ने डोसा करा फक्त १५ मिनिटांत, डाळ- तांदूळ भिजत घालण्याचीही गरज नाही, घ्या रेसिपी
आता त्यामध्ये थोडी जिरेपूड, मीरेपूड, चाट मसाला, चिमूटभर काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घाला. थोड्या वेगळ्या फ्लेवरसाठी अगदी किंचित साखरही घालू शकता. हे सगळं सूप उकळायला ठेवा आणि ते उकळलं की सगळ्यात शेवटी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि १ चमचा तूप किंवा बटर घाला. या रेसिपीने केलेलं सूपसुद्धा अतिशय चवदार होतं.
