कोल्ड ड्रिंक्स, चिप्स आणि कुकीज आज अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. पण या गोष्टी दिसतात तितक्या साध्या आहेत का? अमेरिकेतील एका नवीन संशोधनाने यांची तुलना एका धक्कादायक गोष्टीशी केली आहे. संशोधकांच्या मते, 'अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स' हे ताज्या फळांपेक्षा किंवा भाज्यांपेक्षा सिगारेट आणि तंबाखू उद्योगाशी जास्त मिळते-जुळते आहेत. मग ते त्यांच्या परिणामांच्या बाबतीत असो किंवा ते बनवण्याच्या पद्धतीबद्दल. लोकांकडून हे पदार्थ जास्तीत जास्त खाल्ले जावेत, अशाच पद्धतीने त्यांची रचना केली जाते असा दावा संशोधकांनी केला आहे.
हे संशोधन हार्वर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संयुक्तपणे केलं आहे. हे संशोधन आरोग्य धोरणावर आधारित 'मिल्बँक क्वार्टरली' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रोझन पिझ्झा आणि पाकीटबंद सिरिअल्स बनवणाऱ्या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड कंपन्या अशा काही 'इंजिनिअरिंग स्ट्रॅटेजी' वापरतात, ज्या एकेकाळी तंबाखू उद्योगात पाहायला मिळाल्या होत्या. ग्राहकांना पुन्हा पुन्हा आणि जास्त खाण्यासाठी प्रवृत्त करणं हा यामागचा स्पष्ट उद्देश असतो.
या खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ, फॅट आणि 'ॲडिटिव्हज'चं अचूक प्रमाण मिसळलं जातं, ज्यामुळे मेंदूतील 'रिवॉर्ड सिस्टम' एक्टिव्ह होते. संशोधकांनी या पदार्थांना केवळ अन्न न म्हणता 'जाणीवपूर्वक तयार केलेली, अत्यंत इंजिनिअर केलेली आणि चवीनुसार अनुकूल केलेली उत्पादनं' असं संबोधलं आहे. आरोग्यास असणारे धोके लक्षात घेऊन तज्ज्ञांनी सुचवलं आहे की, या उत्पादनांवर तंबाखूसारखेच कडक नियम लागू करावेत. यामध्ये स्पष्ट चेतावणी देणारे लेबल लावणे, जास्त कर आकारणे, शाळा आणि रुग्णालयांमध्ये विक्रीवर बंदी घालणे आणि मुलांच्या जाहिरातींवर नियंत्रण मिळवणे अशा उपायांचा समावेश आहे. मात्र तंबाखू आणि अन्न यामध्ये एक मोठा फरक असा आहे की अन्न ही जीवनाची मूलभूत गरज आहे, त्यामुळे ते पूर्णपणे टाळता येत नाही. म्हणूनच यावर नियमन असणं अधिक आवश्यक मानलं जात आहे.
या अभ्यासापूर्वी 'द लॅन्सेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या युनिसेफच्या अहवालातही नमूद करण्यात आलं होतं की, सर्वेक्षण केलेल्या ११ देशांमधील ५ वर्षांखालील १० ते ३५ टक्के मुलं नियमितपणे गोड सॉफ्ट ड्रिंक्स पितात. सुमारे ६० टक्के तरुणांनी मान्य केलं की, त्यांनी आदल्या दिवशी किमान एक अल्ट्रा-प्रोसेस्ड उत्पादन खाल्लं होतं. श्रीमंत देशांमध्ये आता हे पदार्थ दैनंदिन एकूण कॅलरीजपैकी अर्ध्याहून अधिक वाटा व्यापत आहेत, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्येही यांचा वापर वेगाने वाढत आहे. जरी शास्त्रज्ञांमध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडला खरोखरच तंबाखूच्या बरोबरीचे मानता येईल का, यावर चर्चा सुरू असली, तरी मुलं आणि तरुणांच्या आहारात वाढत्या प्रमाणामुळे आधुनिक अन्न उद्योगाची भूमिका आणि त्यावरील नियमांचा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
