बरेचदा चमचमीत आणि भारी पदार्थ खावेसे वाटतात. कठीण रेसिपी आपण करतोच. मात्र काहीवेळा साध्या सोप्या रेसिपी खायचे मन होते. सात्विक भारतीय पदार्थ खाल्यावर मनाला वेगळेच समाधान मिळते. असाच एक पदार्थ म्हणजे ही चिंचेची आमटी. (Add tamarind and garlic and make a delicious amti - eat it with rice )भरपूर लसूण घालून केलेला हा पदार्थ भातासोबत अगदी मस्त लागतो. तसेच करायला अगदी कमी वेळ आणि मोजके पदार्थ लागतात. नक्की करुन पाहा.
साहित्य
चिंच, कडीपत्ता, कांदा, लसूण, तेल, टोमॅटो, मीठ, लाल तिखट, हळद, हिंग, पाणी, शेंगदाणे, कोथिंबीर, मोहरी, जिरे, धणे- जिरे पूड, हिरवी मिरची
कृती
१. एका वाटीत गरम पाणी घ्यायचे. त्यात थोडी चिंच भिजवायची. थोड्यावेळाने हाताने ती कुस्करुन घ्या. त्यातील चोथा काढा आणि चिंच गाळून घ्या. कांदा सोला आणि छान बारीक चिरुन घ्या. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. टोमॅटोचे बारीक तुकडे करायचे. हिरव्या मिरचीचेही बारीक तुकडे करायचे. कोथिंबीरीची ताजी जुडी धुवायची आणि बारीक चिरायची.
२. कढईत चमचाभर तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. तसेच चमचाभर जिरे घालायचे आणि छान परतून घ्यायचे. मग त्यात शेंगदाणे घाला आणि छान परतून घ्या. भरपूर लसूण घाला तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मस्त परतून घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला तो ही परता.
३. कांदा छान गुलाबी परता मग त्यात चमचाभर लाल तिखट तसेच चमचाभर हळद घाला, चवीपुरते मीठ घाला आणि पाणी घालून मस्त शिजू द्या. पाणी अगदी मोजून दोन चमचे घालायचे. थोडे हिंग घालायचे, चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. त्यात टोमॅटो घाला आणि एक वाफ काढून घ्यायची. सारे पदार्थ छान शिजल्यावर त्यात चिंचेचे पाणी घालायचे. जरा घट्ट होऊ द्यायचे. गरमागरम भातासोबत खायचे.
