Join us

Saumya Tandon : 'भाभी जी घर पर हैं' च्या 'गोरी मेम'ने सोडली साखर; रताळ्याच्या टेस्टी हलव्याची रेसिपी केली शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:52 IST

Saumya Tandon : अभिनेत्रीने चार वर्षांपूर्वीच साखर खाणं सोडलं होतं. सौम्या टंडनने नुकतीच तिच्या आरोग्याशी संबंधित एक खास गोष्ट शेअर केली आहे.

'भाभी जी घर पर हैं' या टीव्ही शोची गोरी मेम तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अभिनेत्री सौम्या टंडन फिट राहण्यासाठी व्यायाम करते. हेल्दी डाएटसोबतच ती नीट झोपही घेते. ती तिच्या आहाराची विशेष काळजी घेते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अभिनेत्रीने चार वर्षांपूर्वीच साखर खाणं सोडलं होतं. सौम्या टंडनने नुकतीच तिच्या आरोग्याशी संबंधित एक खास गोष्ट शेअर केली आहे.

सौम्याने सांगितलं की, तिने चार वर्षांपूर्वी साखर आणि त्याच्याशी संबंधित सर्व पर्याय जसं की, गूळ, मध आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स खाणं पूर्णपणे सोडून दिलं होतं. या निर्णयामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं असा तिचा विश्वास आहे. आता ती स्वतःला खूप निरोगी समजते. यासंबंधित तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे.

अभिनेत्रीने म्हटलं की, "मी चार वर्षांपूर्वी साखर, गूळ, मध आणि इतर सर्व गोड पदार्थ सोडले होते. मी फक्त फळं, ड्रायफ्रुट्स यापासून बनवलेली मिठाई खाते. हे माझ्यासाठी गेम चेंजर ठरलं. तुम्ही पण हे करून पाहा! मी साखर, गूळ किंवा मधाशिवाय बनवलेल्या मिठाईच्या पाककृती पोस्ट करत राहीन, जेणेकरुन मी दाखवू शकेन की, तुमच्या आरोग्यास हानी न होता गोडपणाचा आनंद घेता येतो."

अभिनेत्री खाते रताळ्याचा हलवा

अभिनेत्री सौम्या टंडननेही कबूल केलं की, तिला कधी कधी साखर खावीशी वाटते. यासाठी ती आरोग्यदायी पर्याय शोधते. तिने साखरेला पर्याय म्हणून रताळं सुचवलं. अभिनेत्री म्हणाली की, तिला साखर खावीशी वाटत असेल तर ती उकडलेलं रताळं खाते. रताळ्याच्या हलव्याची चवदार रेसिपीही तिने शेअर केली आहे.

रताळ्याचा शुगर-फ्री हलवा

- १ टेबलस्पून तूप- उकडलेलं आणि मॅश केलेलं रताळं- दूध- केशर- वेलची पावडर- ड्राय फ्रूट्स

असा बनवा रताळ्याचा हलवा

सौम्या टंडनने सांगितलं की, एका कढईत तूप गरम करा. त्यात मॅश केलेलं रताळं घाला आणि गोल्डन होईपर्यंत तळा. आता त्यात दूध घालून मिक्स करा. चव वाढवण्यासाठी केशर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घाला. काही मिनिटं शिजल्यानंतर गॅस बंद करा. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, या हलव्यावरून असं दिसून येतं की, साखरेशिवायही पदार्थ हे पौष्टिक आणि चवदार बनवता येतात.

साखर सोडण्याचे फायदे

सौम्या म्हणाली की, साखर सोडणं आणि त्याच्याशी संबंधित पर्याय शरीराला अनेक फायदे देतात. साखर सोडल्यास कॅलरीजचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. साखर न खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. रक्तातील साखर राखून शरीरात ऊर्जेची कमतरता भासत नाही. याशिवाय सुरकुत्या आणि पिंपल्ससारख्या समस्याही टाळता येतात. 

टॅग्स :सौम्या टंडनअन्नहेल्थ टिप्सआरोग्य