मासवडी म्हटलं की तयार करायला फार कठीण असेल असे अनेकांना वाटते. मात्र फारच सोपी अशी ही रेसिपी आहे. महाराष्ट्रामध्ये मासवडी फार लोकप्रिय आहे. (A spicy Marathi dish Maswadi! The recipe is not difficult)पाहा मासवडीची सोपी रेसिपी. नक्की करून बघा.
साहित्य(A spicy Marathi dish Maswadi! The recipe is not difficult)
सुकं खोबरं, बेसन, तेल, पाणी, कांदा, हिरवी मिरची, पांढरे तीळ, धणे, शेंगदाणे, जिरे, खसखस, लवंग, काळी मिरी, दालचिनी, वेलची, लसूण, हळद, मीठ, कोथिंबीर, हिंग
कृती
१. सगळ्यात आधी खोबरं किसून घ्या. कांद्याचे लांब तुकडे करून घ्या. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
२. एका कढईमध्ये पांढरे तीळ परतून घ्या. चांगले अर्धी वाटी तीळ वापरा. त्यामध्ये खसखस घाला. पाव वाटी खसखस वापरा. अगदी कोरडं आणि मस्त रंग बदलेपर्यंत परता. परतून झाल्यावर गार करत ठेवा.
३. खडे मसाले परतून घ्या. लवंग, काळी मिरी, दालचिनी, वेलची सगळं छान परतून घ्या. त्यामध्ये धणे घाला खमंग परतून घ्या. नंतर गार करत ठेवा.
४. त्याच कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये शेंगदाणे परतून घ्या. नंतर चिरलेला कांदा परता. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. जिरे घाला. चिरलेली कोथिंबीर घाला. कांदा मस्त गुलाबी झाला की गॅस बंद करा आणि सारण गार होऊ द्या.
५. आता गार करत ठेवलेल्या सगळ्या पदार्थांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करा. परतलेले खोबरे, कांदा, शेंगदाणे, खडे मसाले, तीळ सगळं एकत्र वाटा. जाडसरच वाटा पाणी अजिबात वापरू नका. वाटणामध्ये लाल तिखट, मीठ, हळद घालून छान मिक्स करून घ्या.
६. एका कढईमध्ये चमचाभर तेल घ्या. त्यामध्ये आलं-लसूण-हिरवी मिरची अशी पेस्ट तयार करून घाला. हिंग घाला. अशा पदार्थांमध्ये हिंग घालायला विसरू नका. हिंगामुळे अन्न बाधत नाही किंवा पित्त होत नाही. पेस्ट छान परतून झाल्यावर त्यामध्ये पाणी घाला. पीठलं तयार करायला जेवढे पाणी वापरता तेवढंच पाणी वापरा. पाणी उकळल्यावर त्यामध्ये हळद घाला, मीठ घाला. एकदा ढवळून घ्या. मग त्यामध्ये हळूहळू बेसन घाला. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. सतत ढवळत राहा. पीठ छान घट्ट करून घ्या.
७. पोलपाटावर ओला फडका ठेवा. त्यावरती बेसनाचे पीठ गरम असतानाच थापा. जरा कोमट झाल्यावर त्यावरती तयार केलेले सारण छान पसरवून लावा. नंतर फडक्यासकट गुंडाळी करा. आणि त्याला नीट आकार द्या. हळूहळू फडका सोडवून घ्या आणि जरा घट्ट झाल्यावर मासवडीचे तुकडे पाडून घ्या.