ठेचा म्हटलं की जिभेवर लगेच एक झणझणीत चव रेंगाळायला लागते. मस्त असा हिरवा ठेचा आपण नेहमी खातो. महाराष्ट्रात तर रोज ठेचा भाकरी खाणारे लोक आहेत. तुम्ही कधी कांद्याचा ठेचा खाल्ला आहे का? फार साधी आणि सोपी अशी ही रेसिपी एकदम चविष्ट लागते. (A red, spicy onion thecha is a comfort food!! Even a royal vegetable would pale in comparison to this dish)कमी वेळेत होते आणि हिरव्या ठेच्यापेक्षा चवीला एकदम वेगळी असते. त्यामुळे एकदा नक्कीच करायला हवी. भाजी करायचा कंटाळा आला असेल तर त्या दिवशी हा ठेचा करुन पाहा. सगळ्यांनाच आवडेल.
साहित्य
लसूण, कांदा, शेंगदाणे, पांढरे तीळ, सुकं खोबरं, तेल, लाल तिखट, मीठ
कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. एक अख्खा लसूण घ्यायचा. तसेच दोन कांदे लांब - लांब चिरुन घ्यायचे. सुकं खोबरं छान किसून घ्यायचं.
२. एका तव्यावर लसणाच्या पाकळ्या खमंग भाजून घ्यायच्या. काढून घ्यायच्या आणि त्यातच सुकं खोबरं परतून घ्यायचं. नंतर शेंगदाणेही छान खमंग भाजून घ्यायचे. एका ताटात सारे पदार्थ गार करत ठेवायचे. तव्यावर थोडे तेल घालायचे आणि त्यावर कांदा छान परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात वाटीभर तीळ घालायचे. छान खमंग परतून घ्यायचे.
३. मिक्सर वापरला तरी चालेल. ठेचून केले तर उत्तम. कारण ठेचून केल्यावर त्याला जसा जाडसरपणा येतो तो मिक्सरमध्ये येत नाही. मिक्सरमध्ये वाटत असाल तर एकदाच बटण फिरवू नका. चालू बंद, चालू बंद करुन वाटा. त्यासाठी भांड्यात किंवा ठेचण्यासाठी शेंगदाणे, सुकं खोबरं, कांदा, सारे पदार्थ एकत्र करायचे. त्यात चवीपुरते मीठ घालायचे. तसेच दोन ते तीन चमचे लाल तिखट घालायचे. मस्त ठेचून घ्यायचे. भाकरी , चपाती किंवा भातासोबत खायचे.
