वडा समोसा हे पदार्थ घरी करणे अगदी ,सोपे आहे. विकतच खायला हवेत असे नाही. समोसा करायला कठीण वाटतो मात्र मुळात अगदी सोपा आहे. फक्त समोसाच नाही तर मिनी समोसाही घरी करता येतो. पार्टीमध्ये वगैरे असे मिनी समोसे आपण खातो. त्याची चव मस्त असते आणि आकारही छान दिसतो. त्यामुळे हा स्नॅक्सचा प्रकार लोकप्रिय आहे. मिनी समोसा करणे अगदी सोपे आहे. पाहा रेसिपी.
साहित्य
बटाटा, तेल, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, गरम मसाला, आमचूर पूड, कसुरी मेथी, मैदा, तूप, जिरे, मटार, आलं
कृती
१. बटाटा उकडून घ्यायचा. मटार सोलायचे आणि मटार दाणेही छान उकडून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याची पेस्ट वाटून घ्यायची. एका परातीत मैदा घ्यायचा. त्यात दोन ते तीन चमचे गरम तूप घ्यायचे. मीठ घालायचे आणि जिरे घालायचे. मिक्स करायचे नंतर कोमट पाणी घालून पीठ मळायचे. त्याला तेल लावायचे वर ओलसर कापड ठेवायचं आणि अर्धा तास तसेच ठेवायचे.
२. उकडलेला बटाटा कुस्करुन घ्यायचा, मटारचे दाणेही कुस्करायचे. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यात जिरे घालायचे. तसेच तयार केलेली आलं - मिरची पेस्ट घालायची. मस्त परतून घ्या आणि मग त्यात थोडे लाल तिखट, हळद, मीठ, आमचूर पूड, गरम मसाला कसुरी मेथी घाला. त्यात मटार घाला परतून घ्या. बटाटा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. छान मिश्रण तयार करायचे.
३. मळलेल्या पीठाच्या पुऱ्या लाटा त्याला मध्ये कट करा आणि अर्धगोल तयार करा. त्याच्यामध्ये सारण भरा आणि कडांना पाणी लावा. नंतर कडा जोडून त्याला समोस्याचा आकार द्या. सगळीकडून नीट बंद करा आणि नंतर तेल गरम करत ठेवा. तेल तापल्यावर त्यात एक एक करुन समोसे सोडा आणि मस्त खमंग तळून घ्या. छान कुरकुरीत होतात.
