काही रेसिपी अशा आहेत ज्या घरेघरी केल्या जातात. वर्षानुवर्षे केल्या जात आहेत. फक्त पद्धत थोडी फार वेगळी असते एवढेच .असाच एक पदार्थ म्हणजे बटाटा-वाटाणा रस्सा भाजी. ही भाजी तुम्हीही नक्कीच खाल्ली असेल. (A mouth-watering dish, green pea and potato curry, Just like grandma used to make it!)लहानपणी आई-आजी ही भाजी करायच्या. आमटी आणि भाजी या दोन्ही पदार्थांची भूमिका ही रेसिपी बजावते. वेळ वाचवणारी चविष्ट रेसिपी नक्की करुन पाहा.
साहित्य
कांदा, लसूण, हिरवा वाटाणा, नारळ, आलं, हिरवी मिरची, जिरं, कीळीमिरी, तमालपत्र, दालचिनी, तेल, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, तेल, कडीपत्ता, कोथिंबीर, पाणी, बटाटा, टोमॅटो
कृती
१. हिरवा वाटाणा रात्रभर भिजवायचा. दुसऱ्या दिवशी शिजवायचा. कुकरमध्ये शिजवा. शिजवताना त्यात मीठ घाला. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करा. आल्याचा लहान तुकडा किसून घ्यायचा. बटाट्याचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. ताजा नारळ खवून घ्यायचा.
२. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा तसेच कोथिंबीर घाला आणि परतून घ्या. गार करा आणि वाटून त्याची पेस्ट तयार करा. अगदी थोडे पाणी वापरा.
३. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात जिरं घाला आणि फुलू द्या. कडीपत्ता घाला, नंतर दालचिनीचा तुकडा, दोन काळीमिरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला आणि परतून घ्या. तमालपत्र घाला तसेच इतर आवडीचे सुके मसाले घाला. छान परतून घ्या. नंतर त्यात बटाट्याचे तुकडे घाला आणि बटाटा परतून घ्या. बटाटा छान परतून झाल्यावर, त्यात लाल तिखट, गरम मसाला, घाला. चमचाभर हळद घाला. तसेच इतरही मसाले घालू शकता. सगळे मसाले छान परतून घ्यायचे. त्यात तयार केलेली पेस्ट घालायची आणि थोडे पाणी घालायचे.
४. झाकण ठेवा आणि मस्त वाफ काढून घ्या. तसेच गरजे पुरतेच पाणी घाला. त्यात चवी पुरते मीठ घाला आणि सगळे पदार्थ छान शिजू द्या. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला, रस्स्याला छान असे टेकश्चर येते. बटाटा मऊ होणार नाही याची काळजी घ्या. लगदा होऊ देऊ नका. गरमागरम भातासोबत खा किंवा चपातीसोबत. फार चविष्ट लागते.