वांगी बटाटा रस्सा ही महाराष्ट्रात केली जाणारी एक प्रसिद्ध रेसिपी आहे. करायला अगदीच सोपी असते. मात्र चवीला एकदम छान असते. (A great recipe for spicy eggplant potato gravy - mouthwatering Maharashtrian recipe)जर तुम्हाला चमचमीत पदार्थ आवडतात तर ही भाजी नक्की करुन पाहा. एकदा केलीत तर पुन्हा नक्कीच कराल.
साहित्य
वांगी, बटाटा, लसूण, आलं, हिरवी मिरची, पाणी, तेल, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मोहरी, जिरं, मीठ, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हिंग, धणे-जिरे पूड, कसूरी मेथी, कांदा, टोमॅटो, नारळ
कृती
१. वांग्याचे मोठे मोठे तुकडे करुन घ्यायचे. बटाट्याचेही मोठे तुकडे चिरायचे. बारीक करायचे नाहीत. बटाट्याची सालंही सोलून घ्या. वांगी बटाटे छान धुवा. हिरव्या मिरचीचे तुकडे करा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच आल्याचा लहान तुकडा घ्यायचा आणि आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट तयार करायची.
२. एका कढईत थोडं तेल घ्या. त्यावर बटाट्याचे तुकडे छान परता. तसेच वांग्याचेही परतून घ्या. झाकून ठेवा आणि एक वाफ काढा. वांग अगदीच मऊ होणार नाही याची काळजी घ्या. परतून झाल्यावर वांगं आणि बटाटे काढून ठेवा. त्याच कढईत चमचाभर तेल घ्या आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरं घाला आणि जिरं छान फुलू द्या.
३. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. तसेच आलं लसूण पेस्ट घाला आणि छान खमंग परता. त्यात थोडा नारळ घाला आणि नारळ परतायचा. नारळ खमंग परतल्यावर त्यात टोमॅटो घाला आणि टोमॅटोही छान परतून घ्या. त्यात वांगी आणि बटाट्याचे काप घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यात चमचाभर हळद घाला. चवी पुरते मीठ घाला आणि गरजे पुरते लाल तिखट घाला. चमचाभर गरम मसाला, धणे-जिरे पूड आणि कांदा लसूण मसाला एका वाटीत घ्यायचा. त्यात थोडं पाणी घाला आणि मसाल्याची पेस्ट करा. ती पेस्ट फोडणीत घाला आणि भाजी छान ढवळून घ्या.
४. शेवटी त्यात कसूरी मेथी घाला. गरजे पुरते पाणी घाला आणि एक वाफ काढा. भाजी छान शिजली तसेच मसालेही शिजले की गरमागरम भाजी भाकरी, भात किंवा कशाशीही खा. मस्तच लागते.