घावने हा कोकणातील पारंपरिक आणि अतिशय चविष्ट असा नाश्त्याचा पदार्थ आहे. हा पदार्थ डोश्यासारखा दिसतो, पण त्याची चव, मऊपणा आणि सुगंध हे वेगळेच असतात. विशेषतः पावसाळ्यात किंवा रविवारी सकाळी गरमागरम घावणे तूप आणि चटणीसह खायला मिळाले, तर तो आनंद वेगळाच असतो. (5 tips for making traditional soft ghavan, a delicious snack from konkan, must try )भाताचे पीठ, नारळ आणि पाणी हे त्याचे मुख्य घटक असून यात दहीही वापरले जाते. मात्र दही फार कमी जण वापरतात. कारण घावने चहात बुडवूनही खाल्ली जातात. त्यामुळे त्यात दही घालणे टाळले जाते.
घावने करताना तांदूळ भिजवून त्याचे ताजे पीठ केले तर घावणे जास्त चविष्ट होतात. तांदूळाच्या पीठापेक्षा एकदा या पद्धतीने करुन पाहा. त्यात छान खवलेला नारळ घाला. चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर टाका. आता या मिश्रणात कोमट पाणी थोडं थोडं घालत ढवळत राहा. किंचित पातळ पीठ तयार करायचे. हे पीठ फार घट्ट किंवा फार पातळ नसावे. झाकून ते साधारण अर्धा तास बाजूला ठेवा म्हणजे पीठ थोडं फुलून येईल आणि त्याची चव खुलून येईल.
तवा गरम करुन त्यावर थोडं तेल किंवा तूप लावा. तवा फार गरम नको, मध्यम आचेवर ठेवा. आता तयार केलेलं पीठ एक डावभर घेऊन तव्यावर ओता आणि डोश्यासारखं हलकं फिरवा. तव्यावर ओतण्याआधी व्यवस्थित ढवळून घ्या. तसेच पातळही करा. वर झाकण ठेवून काही वेळ शिजू द्या. एक बाजू शिजल्यावर पलटून दुसरी बाजूही छान होईपर्यंत परतून घ्यायची.
गरमागरम घावणे तव्यावरुन उतरवून त्यावर थोडं तूप घाला आणि बाजूला नारळाची गोड चटणी, गूळ-तूप किंवा आमरसासोबत सर्व्ह करा. काहीजण त्यासोबत तिखट चटणी किंवा लसूण चटणी देखील खातात. तसेच गरमागरम चहातून बुडवून खायला घावणे मस्त लागतात.
घावने हा पदार्थ चविष्टच नव्हे तर हलका आणि पचायला सोपा असतो. नारळामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि भाताच्या पिठामुळे तो पोटभरही लागतो. हा पारंपरिक पदार्थ आजही कोकणातील घराघरांत सकाळच्या नाश्त्यात केला जातो आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली चव जपून ठेवतो.
