Join us  

मस्त पावसात घरीच करा मान्सून चाट पार्टी; चाटचे 5 पौष्टिक प्रकार-पोटही बिघडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2022 10:10 AM

आरोग्य सांभाळायचं म्हणजे चाट खायचंच नाही असं नाही. घरच्याघरी चविष्ट चाट सहज तयार करता येतात. चाटचे हे प्रकार चवीला चटपटीत आणि खायला पौष्टिकही (nutritious chat) असतात. एक दोन नव्हे असे 5 प्रकारचे पौष्टिक आणि चटपटीत चाट तयार करता येतात.

ठळक मुद्देझालमुरी हा बंगाली चाटचा प्रकार आहे. झालमुरी चाट खाल्ल्यानं भूक तर भागते आणि आरोग्यासही फायदाच होतो.पावसाळ्यात पालकाची भाजी खाण्यापेक्षा पालकाचा चाट खावा.स्वीट काॅर्न चाटमुळे पचनक्रिया सुधारते. 

पावसाळ्याच्या दिवसात चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि पावलं बाहेर चाट गाड्यांच्या दिशेनं वळतात. गाड्यावरचे चाट कितीही चटपटीत लागत असले तरी ते आरोग्यास अपाय करतंच. पावसाळ्यात अनेक पाण्याद्वारे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका असतो त्यामुळे मोह आवरुन बाहेरचे चाट न खाल्लेलेच बरे. पण आरोग्य सांभाळायचं म्हणजे चाट खायचंच नाही असं नाही. घरच्याघरी (homemade chat)  चविष्ट चाट सहज तयार करता येतात. चाटचे हे प्रकार चवीला चटपटीत आणि खायला पौष्टिकही (nutritious chat)  असतात. एक दोन नव्हे असे 5 प्रकारचे पौष्टिक आणि चटपटीत चाट तयार करता येतात. तर होवून जाऊ द्या  घरच्या घरी पावसाळ्यातली (monsoon chat party)  चाट पार्टी. घरातले मोठे छोटे सगळेच खूष!

Image: Google

झालमुरी

झालमुरी हा चाटचा बंगाली प्रकार आहे. आरोग्यासही फायदेशीर असा चविष्ट चाटचा प्रकार आहे. झालमुरी खाल्ल्यानं भूक तर भागते आणि आरोग्यासही फायदाच होतो. झालमुरी खाल्ल्यानं शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते. झालमुरीमधील मुरमुऱ्यांमध्ये ब1 आणि ब2 ही जीवनसत्वं असतात. झालमुरी खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. झालमुरी खाल्ल्यानं वजन वाढण्याचा धोका नसतो. यामुळे वजन तर नियंत्रणात राहातच सोबतच मेंदूच्या कार्यासाठीही झालमुरी फायदेशीर असते. झालमुरी तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 4 कप मुरमुरे घ्यावे. त्यात उकडलेला बटाटा आणि काकडी चिरुन घालावी. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरुन घालावी. यात पुदिन्याची हिरवी चटणी, सैंधव मीठ, चाट मसाला, लाल तिखट घालून सर्व सामग्री नीट मिसळून घेतली की झालमुरी तयार होते. 

Image: Google

 पालक चाट

पावसाळ्यात पालकाची भाजी खाण्यापेक्षा पालकाचा चाट खावा. यातून शरीराला लोह आणि इतर पोषक घटक मिळतात. पावसाळ्यात वरचेवर पालक चाट खाल्ल्यास ॲनेमियाचा धोका टळतो. यातून हाडांना फायदेशीर असे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे खनिजं मिळतात. पालक चाट तयार करण्यासाठी पालकाची पानं घ्यावी. ती व्यवस्थित धुवून बारीक चिरुन घ्यावी. ही पानं बेसनाचं मिश्रण तयार करुन त्यात घोळून तळून घ्यावेत. तळलेली पालक भजी टिश्यू पेपरवर ठेवून त्यातील अतिरिक्त तेल काढून टाकावं. नंतर यात दही, हिरवी तिखट चटणी, चाट मसाला, थोडं तिखट घालून ते खावं.

Image: Google

आलू चाट

बटाटा हा कोणत्याही प्रकारात खायला असला की तो आवडतोच. बटाट्याच्या चाटमधून कर्बोदकं, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम ही खनिजं, क जीवनसत्वं आणि फायबर हे घटक शरीराला मिळतात. आलू चाट करणं खूपच सोपं आहे. त्यासाठी बटाट्याचे  तुकडे  करुन ते तळून घ्यावेत. तळलेल्या बटाट्यांच्या तुकड्यांमध्ये बारीक चिरलेला टमाटा, मीठ, हिरवी मिरची, चाट मसाला, कोथिंबीर, चिली फ्लेक्स टाकून सर्व सामग्री नीट मिसळून घ्यावी. नंतर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

Image: Google

स्वीट काॅर्न चाट

स्वीट काॅर्न आरोग्यासाठी फायदेशीर असतो. स्वीट काॅर्नमधून शरीराला अ, ब आणि ई ही जीवनसत्वं, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात. स्वीट काॅर्नमधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. स्वीट काॅर्न चाट तयार करण्यासाठी मका उकडून घ्यावा. एका मोठ्या  भांड्यात उकडलेला मका घ्यावा. त्यात  लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून हे सर्व  नीट मिसळून घ्यावं. सर्वात शेवटी यावर कोथिंबीर बारीक चिरुन घालावी.

Image: Google

 काळ्या हरभऱ्याचा चाट

काळ्या हरभऱ्यांमध्ये अ जीवनसत्व, फाॅस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजं असतात. हरभऱ्यांमध्ये लोहाचं प्रमाणही भरपूर असतं. काळ्या हरभऱ्याचं चाट तयार करण्यासाठी हरभरे भिजवून मग उकडून घ्यावेत. त्यात कांदा, टमाटा बारीक चिरुन घालावा. लिंबाचा रस घालावा. लाल तिखट, चाट मसाला, थोडी  हळद आणि थोडा गरम मसाला घालून सर्व सामग्री नीट मिसळून घेतली की काळ्या हरभऱ्याचा चाट तयार होतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृतीआहार योजना