तूप हा पदार्थ भारतात प्रत्येकाच्या घरी असतो. भाजी, भाकरी, पोळी, भात सगळ्यासोबत हे तूप खाल्ले जाते. तूप सगळ्यांनाच आवडते असे नाही मात्र तूप खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. (5 mistakes to avoid while churning butter, see the perfect recipe for making perfectly smooth and fragrant ghee)त्वचेसाठी तर तूप वरदान आहे. आहारात तूप असणे फार आवश्यक असते. आजकाल अनेकविध कंपन्यांचे तूप बाजारात मिळते. तूप फार महाग असते. तरीही विकत घेतले जाते. खरं तर घरी तूप करणे एकदम सोपे आहे. काही सोप्या स्टेप्स करुन तूप कढवता येते. मात्र त्याला कधी खराब वास येतो, कधी रंग चांगला येत नाही तर कधी घट्टपणाच येत नाही. ते तसेच पातळ राहते म्हणून घरी तूप कढवणे अनेक जण टाळतात. अगदी सोप्या टिप्स लक्षात ठेवा सामान्य चुका टाळा घरी तूप करण्यात काहीच मोठे कोडे नाही. घरचे तूप पौष्टिक असते. विकतचे भेसळयुक्त तूप अजिबात वापरु नका. पाहा तूप करताना काय टाळावे आणि काय करावे.
१. तूप कढवताना वास, रंग आणि चव कायम छान राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. तूप कढवायला सुरुवात करण्याआधी सर्वात पहिले चांगले, ताजे लोणी घ्यायचे. लोणी काढून बराच दिवस फ्रिजमध्ये ठेवले आणि मग वेळ मिळाल्यावर तूप कढवले असे अनेक जण करतात. त्यामुळे तुपाला उग्र वास येतो. लोणी खारट असेल तरी तूप चांगले लागत नाही. त्यामुळे घरचेच लोणी वापरा आणि ताजे वापरा.
२. लोणी वितळवताना गॅस कधीही जास्त ठेवायचा नाही. कायम मंद आचेवरच लोणी तापवायचे. कारण जास्त आचेवर कढवल्यास तूप पटकन गडद होते आणि त्याला गडद रंग येतो. फक्त रंगच नाही तर त्याला जरा जळल्याचा वासही यायला लागतो.
३. भांडे नेहमी जाडच घ्यायचे. पातळ भांड्यात तूप कढवायला ठेवले तर तूप पातेलं करपतं आणि त्याचा वासही लागतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे स्टील किंवा पितळ्याचे भांडे घ्यावे. अॅल्युमिनियमचे भांडे तूप कढवण्यासाठी कधीच वापरु नका. त्यामध्ये तूप पटकन जळवते.
४. लोण्याला फेस आला आणि तो जरा खाली बसून पातळ भाग दिसू लागला. लोण्याला छान सोनेरी पातळ तुपाला असतो तसा रंग यायला लागला की लगेच गॅस बंद करायला हवा. म्हणजे तुपाचा रंग छान राहतो. जास्त वेळ कढवल्यामुळे तूप वेगळ्याच रंगाचे दिसायला लागते.
५. या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा. तसेच तूप गाळायला वापरायचे गाळणे वेगळेच ठेवा. चहाचे गाळणे वापरु नका. तुप गाळून झाल्यावर त्याला अजिबात ढवळत राहू नका. सारखे पाहायची गरज नाही. तूप सेट व्हायला वेळ लागतो. मात्र सतत ढवळ्यामुळे तूप घट्ट होत नाही. त्यामुळे त्याला घट्ट व्हायला वेळ लागला तरी चालेल मात्र सारखा हात लावणे टाळा.