जेवताना तोंडी लावणीसाठी चटणी असेल तर तोंडाला चव येते आणि दोन घास जास्त खाल्ले जातात. आवडीची भाजी नसेल तर हमखास चपाती किंवा भाकरीसोबत चटणी खाल्ली जाते. भारतीय आहारात चटण्यांना विशेष महत्व आहे. चटणी जर ताटात असेल तर जेवणाची मजाच वाढते (4 Types Of Chutneys).
चटणी करण्याच्या सोप्या पद्धती पाहूया. या ४ प्रकारच्या चटण्या जर तयार असतील तर नाश्त्याला कोणत्याही पदार्थासोबत वाढता येतील तसंच जेवणाच्या ताटातही तुम्ही वाढू शकता. चार प्रकारच्या झटपट होणाऱ्या चटण्यांची रेसिपी पाहूया. (4 types of chutneys to make quickly for breakfast or to enjoy with meals)
१) ओल्या नारळाची चटणी
दाक्षिणात्य पदार्थांसोबत ही चटणी खाल्ली जाते. तर काहीजण पोहे किंवा उपम्यासोबतही ही चटणी खातात. ही चटणी करण्यासाठी ओल्या नारळाचे तुकडे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडं चवीनुसार मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. यावर मोहोरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिल्यास चटणीची चव अधिकच वाढेल. इडली, डोसा किंवा वड्यासोबत ही चटणी उत्तम लागते.
२) शेंगदाण्याची चटणी
जेवणाच्या ताटात शेंगदाण्याची चटणी बरेच लोक घेतात. भाजलेले शेंगदाणे, लसूण, लाल तिखट, जीरं आणि मीठ हे साहित्य एकत्र करून जाडसर वाटल्यास खमंग चटणी तयार होते. ही चटणी सुकी असल्यानं प्रवासात नेण्यासाठी किंवा पिठलं भाकरीसोबत खाण्यासाठी उत्तम लागते.
३) कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी
सॅण्डविच, भेळ किंवा कोणत्याही स्टार्टरसोबत ही चटणी खाल्ली जाते. ताजी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि थोडं काळं मीठ वापरून तयार केली जाणारी ही चटणी चवीला उत्तम लागले. लिंबामुळे आणि पुदिन्यामुळे या चटणीला चटपटीत चव येते आणि हिरवा रंग टिकून राहतो.
४) लसणाची चटणी
वडापावची चव वाढवणारी ही चटणी अतिशय चविष्ट असते. सुकं खोबरं, भरपूर लसूण, लाल तिखट आणि मीठ वापरून ही चटणी काही मिनिटांत तयार होते. तोंडी लावण्यासाठी ही चटणी एक उत्तम पर्याय आहे. भाज्यांमध्येही तुम्ही ही चटणी घालू शकता.
