सिमला मिरचीची भाजी करायला अगदी सोपी असते. अनेक प्रकारे खरंतर ही भाजी करता येईल. त्यापैकीच दोन पद्धती पाहा. (2 delicious recipes for making capsicum gravy- cook tasty food in just few minutes )अगदी खमंग आणि चविष्ट भाजी होते. भाकरीशी किंवा पोळीशी खायला अगदी मस्त आहे.
१. साहित्य
सिमला मिरची, लाल तिखट, हळद, मीठ, मोहरी, हिंग, बेसन, तेल, जिरं
कृती
१. सिमला मिरची धुवायची. त्यानंतर त्याचे जाड काप करायचे. जास्त पातळ, बारीक काप करायचे नाही. एका कढईत तेल घ्यायचे आणि तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग त्यात जिरं घालायचं. जिरं छान फुलल्यावर हिंग घाला आणि फोडणी छान परता.
२. त्यात सिमला मिरचीचे तुकडे घालायचे. सिमला मिरची मस्त परतून घ्यायची. त्यावर झाकण ठेवा आणि एक वाफ काढा. थोडे जास्त तेल वापरायचे. या भाजीला तेल जास्त लागते. कमी तेलात होणार नाही. लाल तिखट घाला आणि चमचाभर हळद घाला. तसेच चवी पुरते मीठ घाला आणि परतून घ्या.
३. शेवटी त्यात बेसन पीठ घालायचे आणि परतायचे. बेसन छान एकजीव झाले रंग बदलला की गॅस बंद करायचा. एक ते दोन वाफा काढायच्या. म्हणजे पीठ कच्च राहत नाही.
२. साहित्य
सिमला मिरची, बटाटा, तेल, हिंग, मोहरी, कडीपत्ता, जिरं, पाणी, हळद, मीठ, लाल तिखट
कृती
१. सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे. बटाटाही चिरुन घ्यायचा. साधारण सारख्या आकारात दोन्ही भाज्या चिरा. कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घाला आणि फुलू द्या.
२. जिरं फुलल्यावर त्यात कडीपत्ता घाला आणि हिंग घाला. त्यात बटाटा घाला आणि जरा परतून घ्या. मग तेलात हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचे. त्यात सिमला मिरचीचे तुकडे घालायचे. हळद, तिखटावर परतायचे. चवी पुरते मीठ घालायचे आणि मग त्यात थोडे पाणी घालून वाफ काढायची. वाफ काढल्यावर झाकण काढून घ्यायचे आणि पाणी आटू द्यायचे.