Women Needs More Sleep : सगळ्यांनाच हे माहीत आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप किती महत्वाची आहे. एक्सपर्ट सांगतात की, व्यक्तीने रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. मात्र, तुम्ही जर महिला असाल आणि आठ तासांची झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झालेली नाही. तुम्हाला आणखी थोडावेळ झोप घेण्याची गरज आहे. स्लीप फाउंडेशननुसार, महिलांना पुरुषांपेक्षा झोपेची जास्त आवश्यकता असते. पुरुषांपेक्षा किमान ११ मिनिटं जास्त झोप महिलांसाठी आवश्यक आहे. तर काही रिसर्चचं म्हणणं आहे की किमान २० मिनिटे तरी महिलांनी पुरूषांपेक्षा अधिक झोप घेणं आवश्यक आहे.
चांगल्या झोपेचे फायदे
स्लीप एक्सपर्ट सांगतात की, चांगल्या आरोग्यासाठी झोप एक महत्वाचा भाग ठरते. चांगल्या झोपेमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. तसेच चांगल्या झोपेने हृदयाचं आरोग्य, मेटाबॉलिज्म, त्वचा आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.
चांगली आणि पुरेशी झोप घेतल्याने मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते. तसेच चिंता आणि स्ट्रेस लेव्हलही कमी होते. ज्यामुळे तुमची कार्यक्षमता अधिक वाढते.
खूप दिवस चांगली झोप न घेतल्याने डिमेंशिया आणि अल्झायमरसारखा न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतो. तसेच झोपची समस्या असल्यानं लठ्ठपणा, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो.
महिलांना जास्त झोपेची गरज का?
महिलांना जास्त मल्टिटास्किंग करावं लागतं. म्हणजे एकाचवेळी त्यांना वेगवेगळी कामं करायची असतात. तसेच महिलांचा मेंदू पुरूषांच्या तुलनेत जास्त काम करतो. त्यामुळे रिकव्हरीसाठी जास्त झोपेची गरज असते. इतकंच नाही तर महिलांना स्ट्रेस कमी करण्यासाठीही जास्त झोप गरजेची असते.
झोप कमी झाल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. जास्तकरून वयस्कांनी रोज ७ ते ९ तास झोप घेतली पाहिजे. पण हे प्रमाण वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं.
वयानुसार बदलते झोपेची गरज
नवजात बाळ आणि लहान मुलांना जास्त झोपेची गरज असते. तरूणांना आरोग्य चांगलं ठेवण्यास आणि कामकाज व्यवस्थित करण्यास रात्री ७ ते ९ तासांच्या झोपेची गरज असते. वयस्कांनी रात्री जवळपास ७ ते ८ तास झोप घ्यावी.
डॉक्टरांनुसार, वाढत्या वयासोबत आपल्या झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल होतो. गाढ झोप कमी येत असल्याने फ्रेश वाटत नाही. तसेच ४० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये भरपूर बदल बघायला मिळतो.
एक्सपर्टनी सांगितलं की, अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, महिलांना पुरूषांच्या तुलनेत जवळपास २० मिनिटे अधिक झोपेची गरज असते. एक्सपर्ट म्हणाले की, "मेंदूला रिकव्हर होण्यास झोप महत्वाची ठरते. महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते".