गौरी पटवर्धन
आपल्याला फिट व्हायचं आहे हे ठरलं, त्यासाठी व्यायाम केला पाहिजे हे ठरलं, नियमितपणे केला पाहिजे हे ठरलं, तो कसा करायचा, त्यासाठी वेळ कसा काढायचा याचा प्लॅन ठरला, आता प्रश्न येतो की व्यायाम कुठला करायचा? सगळ्या नवीन व्यायाम करणाऱ्यांनी चालायला जाणं असा काही अलिखित नियम आहे का? कारण आजूबाजूला तसंच होतांना दिसतं. सगळे आपले रोज उठून चालायला जातात. आणि आपल्याला चालायला जायची इच्छा नसेल तर? ते आवडत नसेल तर? त्याचा कंटाळा येत असेल तर? आजूबाजूला चालायला जाण्यासारखे रस्ते नसतील तर? किंवा गुडघेदुखीसारख्या काही दुखण्यांमुळे चालणे या व्यायामाने त्रास होत असेल तर? तर एरोबिक व्यायाम कुठला करायचा?
तर त्यांच्यासाठी जिने चढणं हा एक उत्तम व्यायाम असू शकतो. सोसायटीचा जिना ही व्यायाम करण्यासाठी उत्तम जागा असू शकते. फक्त त्या जिन्याच्या सगळ्या पायऱ्या शक्यतो एकसारख्या असाव्यात. (हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे एवढ्यातल्या एवढ्यात तीन सोसायट्यांमध्ये हा अनुभव आला, की प्रत्येक पायरीची उंची वेगवेगळी होती.) लहानमोठ्या पायऱ्या असतील तर गुडघे दुखणं किंवा लचकणं अपरिहार्य आहे. त्यामुळे चांगला जिना शोधून मग त्यावर व्यायाम करायचा. जिना चढायचा आणि उतरायचा एवढाच व्यायाम. अगदी ५ वेळा जिना चढण्यापासून सुरुवात करायची. आपली वेळ आपण ठरवायची. काही महिन्यात तासभर हा व्यायाम करता येऊ शकतो. त्यानंतरही त्यात अजून व्यायाम व्हायला पाहिजे असेल तर हातात वजन घेऊन जिना चढायचा. या व्यायामातही चालण्यासारखा कंटाळा येण्याची भीती असतेच. पण तरीही आपण जेव्हा धावत जिना चढण्याच्या पातळीला पोचतो त्यानंतर तो व्यायाम कंटाळवाणा उरत नाही. आणि दुसरं म्हणजे जिना चढणे हा व्यायाम करतांना कानात मोट्ठ्या आवाजात मस्त गाणी किंवा ऑडिओबुक्स ऐकता येऊ शकतात. आपण रहदारीच्या रस्त्यावर नसल्यामुळे तसं करण्यात काही रिस्क नसते. फार फार तर आपण कोणातरी घरी जाणाऱ्या व्यक्तीच्या रस्त्यात येऊ.हे झालं ज्यांना हेवी व्यायाम करता येऊ शकतात त्यांच्यासाठी. पण बघा म्हणजे हे करुन पाहता येतंय का..