Join us

शिल्पा शेट्टी सांगतेय अनुलोम-विलोमचे फायदे; पाहा तिचा हा प्रसन्न प्राणायाम व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 18:36 IST

बॉलिवूड क्वीन शिल्पा शेट्टीचा प्राणायाम व्हिडिओ पाहा आणि तुम्हीही प्रेरणा घ्या...

ठळक मुद्देमोकळ्या हवेत प्राणायाम केल्याचे फायदे जाणून घ्या उत्तम आरोग्यासाठी व्यायामात खंड पाडू नका, व्यायामाला कधीच सुट्टी देऊ नका

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिट राहण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असल्याचे आपल्याला माहित आहे. बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून तिची खास ओळख आहे. शिल्पा दर सोमवारी सोशल मीडियावर फिटनेसविषयीचा एक व्हिडियो शेअर करत आपल्या चाहत्यांना जागरुक करत असते. व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे मनाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही व्यायाम करायला हवा असे शिल्पा शेट्टी अनेकदा म्हणते. कधी ती एखदा वर्कआऊट करते तर कधी योगासने, कधी ती भोपळ्याचा रस पिण्याविषयी बोलते तर कधी एखादे फिटनस चॅलेंज पूर्ण करताना दिसते. आता तिने मुकताच एक व्हिडियो सोशल मीडियावर अपलोड केला असून यामध्ये ती अनुलोम-विलोम हे प्राणायमातील प्रकार करताना दिसत आहे. 

शिल्पा सध्या धर्मशाला येथे असून याठिकाणी असलेल्या शुद्ध हवेचे फायदे सांगत ती डोंगरांमध्ये अनुलोम-विलोम आणि कपालभातीसारखे व्यायामप्रकार करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते ‘ऑफलाइन ही नवीन लक्झरी’ आहे. निसर्गासोबत एकरुप होणे आणि सध्याच्या कोविडच्या परिस्थितीत डोके स्विच ऑफ करा कोणत्याही भितीशिवाय मोकळा श्वास घ्या. त्या दिवशी तिने २१ वेळा अनुलोम विलोम, २०० वेळा कपालभाती आणि ओमकार असे श्वसनाचे व्यायाम केले असेही तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. आजुबजूला बर्फाचे डोंगर, शुद्ध हवा, निरव शांतता आणि त्यात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट इतके सुंदर वातावरण असताना तुम्ही सुट्टीवर असाल तरी व्यायामापासून सुट्टी घेऊ शकत नाही असे ती म्हणते. 

अनुलोम करण्याचे फायदे 

आजुबाजूला वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढत असताना फुफ्फुसे चांगली ठेवायची असतील तर अनुलोम-विलोम करणे गरजेचे आहे. हा व्यायामप्रकार तुम्ही घरातही अगदी सहज करु शकता. यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढायला मदत होते. फुफ्फुसांमध्ये असलेला विषारी गॅस बाहेर काढण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि त्यांची ताकद वाढविण्यासाठी या व्यायामप्रकाराचा उपयोग होतो. शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहण्यासाठी तसेच रक्तातील ऑक्सिजन पातळी चांगली राहण्यासाठी अनुलोम उपयुक्त ठरते. नियमित अनुलोम केल्याने शरीरातील पेशींना ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

कपालभातीचे फायदे 

रोज कपालभाती केल्यास लिव्हर आणि किडणीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. ताणतणावांपासून दूर राहण्यास तसेच फ्रेश वाटावे यासाठी कपालभाती हा उपयुक्त प्रकार आहे. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी नियमित कपालभाती करणे अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे तुमची मेमरी स्ट्रॉंग होण्यास मदत होते.  

 

टॅग्स :फिटनेस टिप्सशिल्पा शेट्टीयोगासने प्रकार व फायदेइन्स्टाग्राम