चालणं हा एक साधा पण अतिशय परिणामकारक व्यायाम आहे, ज्यांना जिमचा खर्च परवडत नाही त्यांनी किमान चालायला हवं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं, वजन नियंत्रित करणं सोपं होतं आणि हाडे, स्नायू मजबूत होतात. एकूणच आपण असं म्हणू शकतो की, चालणं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण मॉर्निंग वॉक चांगला की इव्हिनिंग वॉक हा प्रश्न अनेकदा पडतो.
मॉर्निंग वॉकचे फायदे
सकाळी तुम्ही अनेकदा रिकाम्या पोटी चालत असता आणि यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. मॉर्निंग वॉक शरीर आणि मन ताजेतवानं करतं, तर दिवसाच्या सुरुवातीच्या तासात ताजी हवा आणि सूर्यप्रकाश संपूर्ण दिवसासाठी तुमचा मूड सुधारण्यास मदत करतं. सकाळचा सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे.
व्हिटॅमिन डी हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक कार्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. जे लोक मॉर्निंग वॉक करतात त्यांना नेहमीच फायदा होतो. ज्यांना सकाळी उत्साही वाटत नाही त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकतं. यामुळेच विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी मॉर्निंग वॉक बेस्ट आहे.
इव्हिनिंग वॉकचे फायदे
संध्याकाळ तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत करते. चालण्यामुळे एंडोर्फिन बाहेर पडतं, जे तणाव कमी करतं आणि मूड सुधारतं, ज्यांना कामातून किंवा मानसिक थकव्यापासून आराम हवा आहे अशा लोकांसाठी हा एक परिपूर्ण व्यायाम बनतो. रात्रीच्या जेवणानंतर चालणं पचनास मदत करतं आणि पोट फुगण्यास प्रतिबंध करतं.
ज्यांना अपचनाचा त्रास होतो किंवा जेवणानंतर जडपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. संध्याकाळी चालण्यासारख्या हलक्या व्यायामामध्ये गुंतल्याने तुमच्या शरीराला फायदा होऊन चांगली झोप येऊ शकते. निद्रानाश आणि अनियमित झोपेच्या पद्धती असलेल्या लोकांसाठी, संध्याकाळी चालणं फायदेशीर ठरू शकतं.
मॉर्निंग की इव्हिनिंग वॉक... शरीरासाठी काय फायदेशीर?
सकाळ आणि संध्याकाळ चालण्याने हृदयाचं आरोग्य, वजन नियंत्रण आणि स्टॅमिना वाढतो. वेळेनुसार परिणाम बदलू शकतात. रिकाम्या पोटी मॉर्निंग वॉक केल्याने कॅलरी बर्न करण्याची शक्यता जास्त असते, तर संध्याकाळी चालणं पचन आणि जेवणानंतरच्या ग्लुकोजच्या पातळीला नियंत्रित करण्यासाठी अधिक प्रभावी असतं.
मॉर्निंग वॉक निरोगी मनासाठी उत्तम आहे तर दिवसभरात निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी चालणं उत्तम आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे ते तुमच्या गरजांवर अवलंबून आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे की, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्कीच चालत जा.