Join us  

सततची चिडचिड, ताण, नैराश्य टाळायचं तर 'एकच' गोष्ट नियमित करा, सांगतात योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 11:12 AM

International Yoga Day 2022 : योगसाधना ही बाह्य शरीरासाठी जितकी महत्त्वाची असते त्याहून कित्येक पटीने जास्त ती अंतर्मनासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे

ठळक मुद्देदिवसभराच्या धावपळीत मोबाइल, इतर गोष्टी बाजूला ठेवून स्वत:साठी १५ मिनीटे तरी काढायलाच हवीतमनाने फ्रेश असू तर आपण शरीराने आणि एकूणच फ्रेश राहू शकतो...

डॉ. संप्रसाद विनोद 

पूर्वी महिला म्हणजे घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती अशी तिची ओळख होती. पण आता घरची जबाबदारी सांभाळताना ती आपलं स्थान निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रात अतिशय उत्तमपणे उभी आहे. घराच्या बाहेर पडली म्हणून महिलांची जबाबदारी कमी झाली असं नाही तर उलट ती जास्त वाढली. घर, ऑफीस, बाहेरच्या जबाबदाऱ्या, नातेवाईक, सणवार असं सगळं करताना तिची होणारी तारांबळ आपण सगळेच पाहतो (International Yoga Day 2022). सगळ्यांची मनं, भावना सांभाळायच्या आणि यात स्वत:चंही मन शांत आणि तितकंच खंबीर ठेवायचं असेल तर योगाची अतिशय चांगली मदत होते (Yoga for Mind). रोजच्या आयुष्यात आपण अनेकदा चिडतो, काही वेळा संभ्रमावस्थेत असतो, कधी खूप निराश होतो तर कधी वेगवेगळ्या प्रश्नांनी चिंताग्रस्त असतो (Samprasad Vinod). 

(Image : Google)

पण घरातील व्यक्ती, मुलं यांना सांभाळताना महिलांना स्वत:ला संयमी आणि शांत ठेवायचे असते. अशावेळी दुसरे कोणी त्यांची मदत करेलच असे नाही. तर त्यांना स्वत:लाच अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे करणे, कितीही ताण आला तरी तो शांतपणे हाताळणे, रागावर नियंत्रण ठेवत एखाद्या परिस्थितीला सामोरे जाणे हे सगळे योगामुळे साध्य होते. योगसाधना ही बाह्य शरीरासाठी जितकी महत्त्वाची असते त्याहून कित्येक पटीने जास्त ती अंतर्मनासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. योगासने म्हणजे योगा हे जरी खरे असले तरी मनस्वास्थ्यासाठीही योग अतिशय उपयुक्त असतो. हे मनस्वास्थ्य मिळवण्यासाठी काय करायला हवे असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडेल. तर मन स्वस्थ ठेवण्यासाठी करता येतील असे काही उपाय पाहूया. 

१. ध्यान ही योगातील अतिशय उत्तम आणि ताकदवान गोष्ट असून अनेकदा आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यान म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून स्वत:साठी दिवसातील १० ते १५ मिनीटे काढून शांतपणे आपल्या अंतर्मनात डोकावणे हेच आहे. पण सततच्या धावपळीत आणि हातात असलेल्या मोबाइल नावाच्या यंत्रामुळे आपण त्यामध्ये बांधले जातो. मात्र असे न करता प्रत्येक महिलेने दिवसातील १० ते १५ मिनीटांचा वेळ आपल्यासाठी राखून ठेवून त्यावेळात योगसाधना अवश्य करायला हवी. 

२. ध्यानाला बसले की आपल्या डोक्यात खूप विचार येतात. अशावेळी विचारांना दूर न सारता त्या विचारांशी मैत्री करुन, त्यांना समजून घेतले तर त्यांची तीव्रता आणि संख्या नक्कीच कमी होऊ शकते. मात्र त्यासाठी सुरुवात करणे आणि त्यामध्ये सातत्य राखणे निश्चितच आवश्यक आहे. विचार येतात म्हणून त्रागा न करता ते समजून त्यांचा स्वीकार करायला हवा.

३. तसेच योगसाधनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले जाते. याचे कारण आपण बाह्य जगात वावरत असताना स्वत:कडे, आपल्या अवयवांकडे, श्वासाकडे फार कमी वेळा लक्ष देतो. मात्र आपण स्वत:वर प्रेम करु शकलो तरच आपण इतरांवर प्रेम करु शकू. हे लक्षात घेऊन स्वत:च्या आत डोकवून पाहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे योगसाधना आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. 

४. ध्यान करण्यासाठी विशिष्ट जागा, विशिष्ट वेळ हवी असे नाही. तुम्ही स्वत:सोबत जेव्हा जास्त एकरुप होऊ शकाल अशा कोणत्याही वेळेला तुम्ही सोयीस्कर स्थितीत बसून किंवा आडवे होऊन योगसाधना करु शकता. अशावेळी तुम्हाला देवाचा जप करायचा असेल, एखादा मंत्र किंवा प्रार्थना म्हणायची असेल तरीही चालेल. मात्र ठराविक एक गोष्ट नियमितपणे आपल्या जीवनशैलीचा भाग होणे आणि त्यामुळे आपले मन स्वस्थ राहणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे हे समजून घ्यायला हवे. 

(लेखक प्रसिद्ध योग गुरू आहेत.)

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेआंतरराष्ट्रीय योग दिनमानसिक आरोग्यसाधना