Join us

सणासुदीला खूप गोडधोड खाणे होतेय, मग आता डिटॉक्स करण्यासाठी हे उपाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 19:15 IST

सणवार म्हंटलं की गोडधोड, तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ले जातात. यामुळे मग डाएटींगचा सगळाच फज्जा उडतो. 

ठळक मुद्देसणवाराच्या गोडाधोडाच्या जेवणाचा त्रास होऊ द्यायचा नसेल आणि वजनही वाढू द्यायचे नसेल तर बॉडी डिटॉक्स करणे खूप गरजेचे आहे.

सणासुदीला घरात गोडाधोडाचं जेवण बनवलं जातं. कितीही नाही म्हंटलं आणि कितीही ठरवलेलं असलं तरी आग्रह करून करून अगदी पोटाच्या वर जेऊ घातलं जातं. अतिजेवल्यामुळे मग दुपारी मस्तपैकी ताणून दिली जाते. जेवण आणि झोप असं मस्त कॉम्बिनेशन जमून आलं की मग वजनाचा काटा अगदी उड्या मारत मारतच पुढे जाऊ लागतो. यासगळ्याचा परिणाम म्हणजे मग खूप मेहनत करून, उपाशी तापाशी राहून घटवलेलं वजन अगदी भराभर वाढायला लागतं. 

 

श्रावणाला सुरूवात झालेली आहेच. त्यामुळे आता एकामागोमाग एक सण येत राहणार आणि थेट दिवाळीपर्यंत गोडाधोडाच्या पंगती रंगणार. सणवाराच्या या जड जेवणाचा त्रास होऊ द्यायचा नसेल आणि वजनही वाढू द्यायचे नसेल तर बॉडी डिटॉक्स करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच तर सण झाला की लगेच दुसऱ्या दिवशी खाण्यापिण्याचे हे नियम पाळा आणि बाॅडी डिटॉक्स करा. बॉडी डिटॉक्स केल्यामुळे जडपणा जाणवणार नाही आणि उर्जा व उत्साह टिकून राहील. 

असे कर बॉडी डिटॉक्स१. भरपूर पाणी प्याडिटॉक्सिफिकेशनचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास शरीरातून टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी खूप जेवण झालं असेल, तो दिवस आणि त्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस भरपूर पाणी प्या. 

 

२. लिंबू आणि मधबाॅडी डिटॉक्स करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सकाळी एक ग्लास काेमट पाणी करावे. या ग्लासात मध्यम आकाराचे अर्धे लिंबू पिळावे आणि एक चमचा मध टाकावा. मिश्रण व्यवस्थित हलवावे आणि त्यानंतर हे पाणी प्यावे. यामुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते आणि अपचनाचा त्रास होत नाही. 

 

३. हर्बल टी घ्यासणासुदीच्या दुसऱ्यादिवशी चहा अतिरिक्त प्रमाणात पिऊ नये. बॉडी डिटॉक्स व्हावी, असे वाटत असेल तर साध्या चहाऐवजी हर्बल टी, ग्रीन टी घ्यावा. किंवा दूध साखर न घालता केलेला कोरा चहा घ्यावा. या चहामध्ये अर्धे लिंबू पिळावे.

 

४. दुसऱ्या दिवशी असा आहार घ्याबॉडी डिटॉक्स होण्यासाठी दुसऱ्या दिवशी आहारावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे खूप सारी फळे, सॅलड, सुप, एखादी भाकरी, खिचडी, दही, ताक, लिंबूपाणी, ज्यूस असे पदार्थ घ्यावे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सपौष्टिक आहार