lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > खरं सांगा, आपल्याला खरंच श्वास घेता येतो? प्राणायाम करताना तुम्ही चुकत तर नाही..

खरं सांगा, आपल्याला खरंच श्वास घेता येतो? प्राणायाम करताना तुम्ही चुकत तर नाही..

श्वास आपल्या शरीरात येतो कसा, जातो कसा, याची काही जाणीवच आपल्याला नसते, मग  आपण ध्यान करतो, प्राणायाम करतो म्हणजे नक्की काय करायचं हे शिकून घ्यायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 02:37 PM2021-06-10T14:37:38+5:302021-06-10T14:43:32+5:30

श्वास आपल्या शरीरात येतो कसा, जातो कसा, याची काही जाणीवच आपल्याला नसते, मग  आपण ध्यान करतो, प्राणायाम करतो म्हणजे नक्की काय करायचं हे शिकून घ्यायला हवं.

can you really breathe? If you are doing pranayama .. learn meditation | खरं सांगा, आपल्याला खरंच श्वास घेता येतो? प्राणायाम करताना तुम्ही चुकत तर नाही..

खरं सांगा, आपल्याला खरंच श्वास घेता येतो? प्राणायाम करताना तुम्ही चुकत तर नाही..

Highlightsध्यान जर योग्य पद्धतीने केले नाही तर आपलेच "ध्यान" होऊन जाईल. 

वृषाली जोशी-ढोके

टेन्शन कायको लेने का, सही बोलता सही बोलता, भेजा क्यू सरकानेका, सही बोलताय, सही बोलताय....
खूप लोकप्रिय झाले होते हे बॉलिवूड गाणे. खरंच असं आपल्याला टेन्शन न घेता "स्ट्रेस फ्री लाईफ" जगता आले तर...! आज काल वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासून ते वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावा खाली आहे. तो ताण स्वतः कडून वाढलेल्या अपेक्षांचा असू शकतो किंवा बाहेर असलेल्या स्पर्धेचा असू शकतो. आणि त्या ताणाला जर नीट हाताळू शकलो नाही तर मग आहेतच आत्महत्या, नैराश्य, व्यसनाधीनता, पळपुटेपणा. या वर मात करायची असेल तर सगळेच जण सांगतात प्राणायाम करा, ध्यान करा. पण प्राणायाम, ध्यान जर योग्य पद्धतीने केले नाही तर आपलेच "ध्यान" होऊन जाईल. 

प्राणायाम म्हंटले की लगेच सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा येते ती म्हणजे नाकपुड्या बंद करायच्या आणि जोरात श्वासोच्छ्वास करायचा. पण त्या आधी आपल्याला आपल्या श्वसन मार्गाची जुजबी माहिती, प्राणायाम म्हणजे काय, आपण तो का करतो, त्याचे प्रकार किती, या सगळ्याचा फायदा काय हे सगळं माहीत करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्राणायाम ह्या शब्दातच "प्राण" आहे म्हणजेच श्वास. आणि श्वास म्हणजेच जीवन, कारण श्वास संपला की आयुष्य संपतं. प्राणायाम हा शब्द प्राण + आयाम = प्राणायाम असा तयार झाला आहे. प्राण म्हणजे आत्मशक्ती किंवा चैतन्य जे शरीरात वास करते. शरीरातील जीव जगवण्यासाठी हवा आत ओढून घेतली जाते ती हवा प्राणा मध्ये खेचून घेतली जाते आणि नंतर उरलेली निरुपयोगी हवा उच्छवासाद्वारे बाहेर टाकली जाते. म्हणजेच काय की प्राणायामाचा अभ्यास करताना आपल्याला आपल्या स्वतःच्या श्वास उच्छावासावर जवळून लक्ष द्यायचे आहे. आपण जन्माला आलो तेव्हा पासून आज पर्यंत आपल्याला शाळेत, आई वडिलांनी, डॉक्टरांनी किंवा अजून कोणीही श्वास कसा घ्यायचा, सोडायचा हे शिकवले नाही. हा श्वसनाचा अभ्यास मात्र फक्त योगशास्त्रात सांगितला आहे. पतंजली मुनींनी त्यांच्या पातंजल योगग्रंथात "अष्टांग योग" सांगितला आहे. प्राणायाम ही अष्टांग योगाची ( यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी) चौथी पायरी आहे. पहिल्या तीन पायऱ्या नीट समजवून न घेताच प्राणायामावर उडी मारली तर त्याचा उपयोग कमी आणि त्रास होण्याची शक्यता असू शकते. त्या मुळे आसनांचा व्यवस्थित अभ्यास झाला की प्राणयामाची पूर्वतयारी म्हणून पूरक असलेल्या श्वसनाचे प्रकार किती व कोणते हे आधी जाणून घेणे आवश्यक आहे.

 

श्वसनाचे त्याच्या गती नुसार तीन प्रकार होतात.

१. संथ श्वसन :- शरीराची कोणतीही हालचाल होत नसताना शरीर नैसर्गिक स्थितीत असताना जे श्वसन स्थिर गतीने चालू असते त्याला संथ श्वसन म्हणतात. या प्रकारात श्वसनावर कोणतेही नियंत्रण किंवा बंधन नसते.
२. दीर्घ श्वसन :- या प्रकारामध्ये जाणीवपूर्वक श्वसनाची गती संथ श्वसनापेक्षा कमी केलेली असते. दीर्घ श्वसनात शरीराची प्राणवायूची गरज कमी केली जाते आणि शरीरातील जास्तीत जास्त कार्बनडाय ऑक्साईड बाहेर काढून टाकला जातो.
३.जलद श्वसन :- या प्रकारामध्ये संथ श्वसनापेक्षा प्रयत्नपूर्वक श्वसनाची गती जलद केली म्हणजेच वाढवली की जलद श्वसनाचा अभ्यास होतो. जलद श्वसनामुळे नासिकामार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो आणि श्वसन इंद्रियांना चांगलाच व्यायाम मिळतो.
त्यामुळे प्राणायाम मनानंच ऑनलाइन करु नका, छान शिकून, समजून, सावकाश, शास्त्रीय पध्दतीने करा.

( लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)

Web Title: can you really breathe? If you are doing pranayama .. learn meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.