Belly Fat : आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. प्रत्येकाचा लठ्ठपणा वेगवेगळा असतो, तर कुणाच्या केवळ पोटावर चरबी जमा होते. तर काहींच्या संपूर्ण शरीरात चरबी जमा झालेली असते. आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि शरीर संतुलित राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात चरबी असणं महत्वाचं आहे. पण चरबी जास्त असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
पोटावर खूप जास्त चरबी वाढली की, लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना एक प्रश्न असतो की, पूर्ण शरीराऐवजी केवळ पोटावरील चरबी कमी करता येईल का? याबाबत काही रिसर्च करण्यात आले आहेत. जर तुम्हीही पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यापेक्षा केवळ पोटावरील कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हे शक्य आहे का? हे जाणून घेऊ.
फक्त पोटावरील चरबी कमी करता येते का?
जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी शरीरातील एखादा एरिया ठरवतो, तेव्हा त्याला स्पॉट रिडक्शन असं म्हटलं जातं. अनेक रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, कधी कधी स्पॉट रिडक्शन वेट लॉस प्लॅन यशस्वी होत नाही.
जर्नल ऑफ स्ट्रेंथ कंडीशनिंग रिसर्चमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, ६ आठवडे ऍब्स वर्कआउट करूनही व्यक्तीच्या पोटावरील चरबी कमी होत नाही. एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, १२ आठवडे हाताचे वर्कआउट करूनही हातावरील चरबी कमी झाली नाही. तर हातावरील चरबी सैल होती ती टाइट झाली होती. या दोन्ही रिसर्चमधून हे समोर येतं की, अनेक केसेसमध्ये वर्कआउट किंवा एक्सरसाईज सुद्धा वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत नाही. खासकरून पोटावरील चरबी करण्याबाबत असं होतं.
मात्र, एक्सपर्ट सांगतात की, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शरीराचा मेटाबॉलिज्म रेट. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म खूप महत्वाचं ठरतं. चांगल्या मेटाबॉलिक रेटसाठी नियमित एक्सरसाईज करणं सर्वात चांगलं मानलं जातं.
काय आहे मेटाबॉलिज्म?
मेटाबॉलिज्म ही शरीरात होणारी एक महत्त्वपूर्ण क्रिया आहे. यातून सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलला जातो. शरीराला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज पडते. आणखी साध्या शब्दात सांगायचं तर मेटाबॉलिज्मने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वेगवेगळ्या पेशी तयार करण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्मीची क्रिया आपल्या शरीरात २४ तास सुरु असते. इतकेच काय तर आपण आराम करत असतानाही याची क्रिया सुरु असते.
नेमकं काय होतं?
मेटाबॉलिक रेटमुळे पोटावरील चरबी कमी कशी होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाईज करते तेव्हा शरीरात एक हार्मोन रिलीज होतं. हा हार्मोन मेटाबॉलिक रेटचा वेग वाढवतो आणि यानं शरीरात जमा चरबी कमी होऊ लागते. पोट, हात आणि छातीवरील चरबी मेटाबॉलिक रेट वाढल्यानं कमी होऊ शकते.
पोट कमी करण्यासाठी एक्सरसाईज
अनेक रिसर्चनुसार, एरोबिक, रनिंग करणं, स्वीमिंग करणं, सायकलिंग या एक्सरसाईज संपूर्ण शरीर फिट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगल्या एक्सरसाईज मानल्या जातात. त्यासोबतच या एक्सरसाईजच्या मदतीनं पोटावरील चरबीही कमी करण्यास मदत मिळते.