Fitness Tips : तासंतास एकाच जागी बसून काम करण्याची पद्धत आजकाल खूप वाढली आहे. जे लोक दिवसातील जास्तीत जास्त वेळ एका जागी बसून काम करतात अशांना कोणकोणत्या समस्या होतात, याबाबत वेळोवेळी वेगवेगळे रिसर्चही समोर येत असतात. एकाच स्थितीत बसून काम केल्यानं शरीराचं पोश्चर तर बिघडतं, सोबतच लठ्ठपणा, हृदयरोग, डायबिटीस, बीपी आणि मानसिक या समस्या होण्याचा धोका अधिक असतो.
बदललेल्या लाइफस्टाईलमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बरेच लोक आजकाल वेगवेगळ्या गोष्टी करतात. यात सगळ्यात जास्त जर काही फॉलो केलं जात असेल तर ते म्हणजे पायी चालणं. म्हणजे दिवसभर एकाच जागी बसून जे नुकसान होतात, ते टाळण्यासाठी लोक रोज २० ते ३० मिनिटं पायी चालतात. पण अनेकांना पायी चालण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. जर तुम्हाला सुद्धा पायी चालायला वेळ नसेल किंवा जमत नसेल तर तुमच्यासाठी एक वेगळा आणि प्रभावी पर्याय आहे. तो म्हणजे स्क्वॅट्स. ३० मिनिटं पायी चालण्याऐवजी तुम्ही जर रोज केवळ १० मिनिटं स्क्वॉट्स कराल तर तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो.
अमेरिकन डॉक्टर मार्क हायमन सांगतात की, कामाच्या मधे थोडा वेळ काढून काही मिनिटं तुम्ही स्क्वॉट्स करा. डॉक्टरांनी एका रिसर्चचा हवाला देत सांगितलं की, ८.५ तास बसून काम करण्यादरम्यान दर ४५ मिनिटांनी १० बॉडीवेट स्क्वॉट्स करणं ३० मिनिटं पायी चालण्याच्या तुलनेत ब्लड शुगर रेग्युलेशनसाठी अधिक प्रभावी ठरतं.
नुकसान टाळण्यासाठी काय करावं?
डॉक्टर मार्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं की, एका ताज्या रिपोर्टमधून हे स्पष्ट झालं आहे की, जास्त वेळ बसण्यादरम्यान मधे मधे शारीरिक हालचाली केल्या तर यानं ग्लायसेमिक कंट्रोलमध्ये सुधारणा होते. तासंतास एकाच जागी बसून राहिल्यानं ब्लड शुगर नियंत्रणात बिघाड होतो. अशात तुम्ही थोड्या थोड्या वेळानं काही अॅक्टिविटी केल्या पाहिजे.
१० बॉडीवेट स्क्वॅट्स अधिक प्रभावी
या रिसर्चमध्ये सहभागी लोकांनी दर ४५ मिनिटांनी ३ मिनिटं वॉक किंवा १० बॉडीवेट स्क्वॉट्स केले, यांचं ब्लड शुगर रेग्युलेशन त्या लोकांपेक्षा चांगलं होतं, जे केवळ बसून राहिले किंवा दिवसातून केवळ ३० मिनिटं चालले.