10 Minute Walk Benefits : आपण अनेकदा विचार करतो की फिट राहण्यासाठी तासन्तास जिममध्ये जाणं किंवा जास्त वेळ व्यायाम करणं आवश्यक आहे. पण अलीकडच्या संशोधनानुसार फक्त 10 मिनिटं पायी चालणंही आपल्या हृदयासाठी आणि एकूण आरोग्यासाठी चमत्कार करू शकतं. एका अभ्यासात असं आढळलं की, बरेच लोक दिवसभरात 5,000 पावलंही चालत नाहीत. ज्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. म्हणजेच जितका जास्त वेळ आपण बसून राहतो, तितकं शरीराचं संतुलन बिघडतं.
काय सांगतं संशोधन?
‘Annals of Internal Medicine’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात 30,000 हून अधिक लोकांचा डेटा तपासण्यात आला. यात दिसून आलं की जे लोक रोज 8,000 पावलांपेक्षा कमी चालत होते, पण 10–15 मिनिटं सलग चालत होते, त्यांच्यात हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका खूप कमी होता.
संशोधन सांगतं की पावलांची संख्या जितकी महत्त्वाची आहे, तितकंच महत्त्वाचं आहे की ती पावलं तुम्ही कशी चालता. घरात किंवा ऑफिसमध्ये छोट्या छोट्या फेऱ्या मारणं उपयोगी असतं, पण जेव्हा आपण सलग काही मिनिटं वेगाने चालतो, तेव्हा त्याचा शरीरावर खूप चांगला परिणाम होतो.
प्रत्येक पाऊल फायदेशीर
संशोधक बोरजा डेल पोरो क्रूज यांच्या मते, “कुठल्याही प्रकारचं चालणं हृदयासाठी चांगलं असतं, पण जर ती पावलं सलग घेतली गेली, तर त्याचा फायदा अनेक पटींनी वाढतो.” म्हणजेच, थोडं जास्त चालणं म्हणजेच थोडी जास्त आयुष्याची शक्यता.
जास्त मेहनत नाही, फक्त थोडा बदल
तज्ज्ञांच्या मते, तब्येत टिकवण्यासाठी रोज जिमला जाणं किंवा व्यायामासाठी विशेष वेळ काढणं आवश्यक नाही. फक्त आपल्या दैनंदिन सवयींमध्ये थोडा बदल करा. जसं की बाजारात पायी जाणं, मुलांना शाळेत सोडताना थोडं चालणं किंवा लंच ब्रेकमध्ये 10 मिनिटांची वॉक घेणं, इतकं पुरेसं आहे. थोडं चालण्याच्या पद्धतीत बदल केल्यानेही मोठा फरक पडतो.
सुरुवात कुठून करावी?
पब्लिक पॉलिसी संशोधक क्रिस विएलगा सांगतात, “सुरुवात तिथूनच करा जिथे आपण आहात.” चालण्यासाठी खास पार्क किंवा ट्रॅक शोधण्याची गरज नाही. आपल्या गल्लीत, परिसरात किंवा ऑफिसच्या आसपास फिरा. चालताना तुम्ही केवळ आपलं आरोग्य सुधाराल असं नाही, तर आजूबाजूच्या छोट्या सुंदर गोष्टीही अनुभवू शकाल.
