Rakul Preet Singh Fitness Secret : साउथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग केवळ तिचा अभिनय, सौंदर्य नाही, तर तिच्या परफेक्ट फिट बॉडीसाठीही ओळखली जाते. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. अशात साहजिक आहे की, तिच्या महिला फॅन्सना नक्कीच प्रश्न पडत असेल की, रकुल इतकी फिट कशी राहते? इतकी स्लिम दिसण्यासाठी ती काय खात असेल? या प्रश्नांची उत्तरं तिनेच अलिकडे दिली आहेत. ३४ वर्षांची रकुल प्रीत सिंग हिने अलीकडेच सांगितले की ती गव्हाची पोळी खात नाही, तर त्याऐवजी इतर धान्यांचा आहारात समावेश करते.
गव्हाऐवजी ज्वारी-रागी
‘खाने में क्या है’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रकुल म्हणाली,“डाळ, पोळी, भाजी हे प्रत्येक उत्तर भारतीयाचं मुख्य जेवण आहे. तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता. मी गेल्या १० वर्षांपासून ज्वारीची भाकरी खाते. लहानपणी मी गव्हाची पोळीही खायचे आणि ज्वारीही. पण गेल्या १० वर्षांत मी फक्त ज्वारी किंवा रागी, यापैकी एकच खाते.”
घरच्या जेवणात स्मार्ट चॉइस
‘थँक गॉड’ चित्रपटातील अभिनेत्री पुढे म्हणाली, “कधीमधी बाहेरचं किंवा वेगळं खाणं चालतं, पण घरी जेवताना स्मार्ट चॉइस करणं महत्त्वाचं आहे. डाळ, भाजी किंवा चिकन तेच राहते, फक्त पीठ बदलतं. फरक नक्की जाणवतो. पचनसंस्था हा आपल्या शरीराचा दुसरा मेंदू आहे.”
तज्ज्ञ काय सांगतात?
‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना कन्सल्टंट डायटिशियन गरिमा गोयल म्हणाल्या, “गव्हाऐवजी ज्वारी किंवा रागीसारखे मिलेट्स दीर्घकाळासाठी जसं की १० वर्षे आहारात घेतल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात.”
ज्वारी आणि रागीचे फायदे
तज्ज्ञांच्या मते ज्वारीची भाकरी आणि रागी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री असल्याने पचायला हलके असतात. ग्लूटेन इनटॉलरन्स असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे. यात फायबर भरपूर असतं, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. तसेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायला मदत मिळते. पचनसंस्था सुधारते. दीर्घकाळात लठ्ठपणा, डायबिटीज आणि बद्धकोष्ठता यांचा धोका कमी होऊ शकतो.
