Adnan Sami Weight Loss Secret : वजन कमी करणं ही आज एक मोठी समस्या झाली आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कुणी एक्सरसाइज करतं, कुणी डाएट करतं तर कुणी औषधं घेतं. इतकंच नाही तर काही लोक वजन कमी करण्यासाठी सर्जरी सुद्धा करून घेतात. हा वजन कमी करण्यास सोपा असल्याचं त्यांना वाटतं. यानं काही किलो वजन तर कमी होतं, पण काही महिन्यांत पुन्हा वाढतं. म्हणूनच नैसर्गिक आणि सस्टेनेबल पद्धतीने वजन कमी करणंच सगळ्यात फायदेशीर ठरतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी, ज्यांनी डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करून तब्बल 120 किलो वजन कमी केले.
230 किलोपासून 110 किलोपर्यंतचा अविश्वसनीय प्रवास
अदनान सामी यांचं वजन कधीकाळी 230 किलो होतं. त्यांच्या बदललेल्या फिटनेस जर्नीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी ना वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक सर्जरी केली, ना लिपोसक्शन फक्त लाइफस्टाइल बदलून 120 किलो वजन कमी केले.
एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “लिपोसक्शन अजिबात केलेलं नाही, आणि बॅरिएट्रिक सर्जरीही नाही.”
मग नेमका कोणता डाएट प्लॅन फॉलो केला?
त्यांच्या न्यूट्रिशनिस्टने त्यांना एक साधा पण अतिशय स्ट्रिक्ट डाएट प्लॅन दिला. या प्लॅनमुळे पहिल्याच महिन्यात त्यांचं 20 किलो वजन कमी झालं.
No Bread — ब्रेड नाही
No Rice — भात नाही
No Sugar — साखर नाही
No Oil — तेल टाळलं
No Alcohol — मद्यपान नाही
म्हणजेच ताटातून ज्या गोष्टींमुळे जास्त कॅलरी आणि फॅट तयार होतं, त्या सगळ्या त्यांनी काढून टाकल्या. या साध्या पण संतुलित डाएटमुळे त्यांना वजन घटवण्यात मोठी मदत झाली.
एका XL टी-शर्टने दिली मोठी प्रेरणा
वजन कमी करणं म्हणजे फक्त डाएट आणि व्यायाम नसून, मानसिक ताकदीचीही मोठी परीक्षा असते. अदनान सामी यांच्यासाठी प्रेरणादायी वळण ठरलं एक XL साइजचं टी-शर्ट.
ते सांगतात की, एकदा मॉलमध्ये त्यांना एक सुंदर XL टी-शर्ट दिसलं, पण तेव्हा त्यांचा साइज 9XL होता. आईने म्हटलं की “या टी-शर्टमध्ये तर तुझा हातही नाही जाणार.” हीच गोष्ट त्यांच्या मनावर ठसली.
जेव्हा जेव्हा त्यांना वाटत होतं की वजन थोडं कमी झालंय, तेव्हा ते ती टी-शर्ट घालून पाहत. आणि एक दिवस रात्री 3 वाजता ती टी-शर्ट त्यांना फिट झाली! ते आनंदाने नाचू लागले आणि वडिलांना फोन करून सांगितलं. हा छोटासा क्षण त्यांच्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा बनला.
कठोर परिश्रम, शिस्त आणि संयम
अदनान सामी म्हणतात की, “मी खूप मेहनत केली आहे. आयुष्यात कोणताही शॉर्टकट नसतो.” 54 वर्षांच्या वयातही त्यांनी सिद्ध केलं की जिद्द असेल तर कितीही वजन असलं तरी योग्य लाइफस्टाइलने ते कमी करता येतं. त्यांची फिटनेस जर्नी शिकवते की बदल बाहेरून नाही, आतून सुरू होतो मनापासून, विचारांपासून, इच्छाशक्तीपासून.
अदनान सामींची कहाणी फक्त वजन कमी नव्हे, तर आत्मविश्वासाचा प्रवास आहे. त्यांचा “नो ब्रेड, नो राइस, नो शुगर” डाएट प्लॅन आणि त्यांची सकारात्मक विचारसरणी वजन कमी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी शिकवण आहे.
