लग्न म्हणजे आयुष्यातले एक महत्त्वाचे वळण. पण ते वळण नेमके कधी घ्यायचे? योग्य वयात लग्न व्हायलाच हवे असे काही जण म्हणतात तर काही जण म्हणतात जिलो अपनी जिंदगी. खरं तर हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवांवर आणि तयारीवर घ्यायला हवा, असे ही अनेक विचारवंत सांगतात. (Girls, don't get married too soon! Malaika Arora's advice, think about it, otherwise you will regret it..)इंडिया टुडे सोबतच्या संवादात लग्नसंस्था, लवकर लग्न केल्याचे तोटे आणि स्वतःच्या आयुष्यातून घेतलेले धडे याबद्दल मलायका अरोराने साध्या भाषेत विचार मांडले.
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. मॉडेलिंग, अभिनय, नृत्य आणि रिअॅलिटी शो जज म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १९९८ साली तिने अभिनेता अरबाज खान याच्याशी लग्न केले. त्या वेळी मलायका २४ - २५ वर्षांची होती. लग्नानंतर काही वर्षे दोघे एकत्र होते आणि त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. मात्र कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. २०१६ मध्ये ते वेगळे झाले आणि २०१७ मध्ये अधिकृतपणे त्यांचा घटस्फोट झाला. हा निर्णय सोपा नव्हता. समाजाची टीका, प्रश्न, कुजबुज याला तिला सामोरे जावे लागले. तरीही स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि आयुष्य प्रामाणिकपणे जगण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचे तिने अनेक वेळा सांगितले आहे.
याच अनुभवांच्या आधारे तिने इंडिया टुडेच्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की लवकर लग्न करू नये. खूप लहान वयात आपण स्वतःला नीट ओळखत नाही. आयुष्यात काय करायचे आहे, आपल्याला कशात आनंद मिळतो, आपल्या अपेक्षा काय आहेत याची समज आलेली नसते, अशा वेळी घेतलेला लग्नाचा निर्णय पुढे जाऊन ओझे वाटू शकतो. त्यामुळे आधी आयुष्य जगावे, अनुभव घ्यावेत, स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे तिचे मत आहे. मुलींसाठी हा जास्त महत्वाचा भाग ठरतो असेही मलायका नेहमी सांगते.
मलायका म्हणते, महिलांवर लग्नासाठी नेहमीच एक अदृश्य दबाव असतो. वय वाढत आहे, लोक काय म्हणतील, कुटुंबाची अपेक्षा अशा अनेक गोष्टींमुळे घाई केली जाते. पण लग्न हे आयुष्याचे अंतिम ध्येय नसून आयुष्याचा एक भाग आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःचा आत्मविश्वास असेल तरच नात्यांमध्ये समजूतदारपणा टिकतो. स्वत:च्या घटस्फोटाकडे मागे वळून पाहताना तिने पश्चात्ताप नसल्याचेही सांगितले. उलट त्या अनुभवातून तिला स्वतःला अधिक चांगले ओळखता आले, अधिक मजबूत होता आले. त्या लग्नाने तिला तिच्या आयुष्याचे सगळ्यात मोठे वरदान तिचा मुलगा दिल्याचेही तिने सांगितले. लग्न वेळेत आटपायची घाई न करता वेळ घ्या असे मलायका बिनधास्तपणे सांगते.
